मुंबई : वैद्यकीय विश्वात हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया जटिल आणि खर्चीक म्हणून ओळखली जाते. खासगी रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, त्यासाठी २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च येतो. सामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेली ही शस्त्रक्रिया आता मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील केईएम रुग्णालयातही होऊ शकणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला परवाना रुग्णालयाला सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळाला आहे. हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेणारे केईएम हे सार्वजनिक क्षेत्रातील राज्यातील पहिले रुग्णालय आहे.
गेल्या काही वर्षांत अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया वगळता अन्य अवयवांच्या शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयात होत नाहीत. खासगी रुग्णालयांत मात्र फुप्फुस, लहान आतडे, हृदय, किडनी, यकृत आणि स्वादुपिंड या अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतात. मात्र, त्यासाठी भरमसाठ खर्च करावा लागतो. गरीब रुग्णांना त्यासाठी सरकारी मदत आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. या पार्श्वभूमीवर केईएममध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वीच महापालिकेतर्फे करण्यात आली होती.
उल्लेखनीय म्हणजे १९६८ मध्ये देशातील पहिल्या हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. पी. के. सेन यांनी केईएममध्ये केली होती. कालांतराने काही कारणास्तव अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा हे सत्र सुरू होणार आहे.
आम्हाला हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा परवाना मिळाला आहे. या शस्त्रक्रियेशी संबंधित काही यंत्र सामुग्री येणे बाकी आहे ती लवकरच येणार आहे. त्यानंतर या शस्त्रक्रियांना सुरुवात होणार आहे.- डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय