मुंबई - अवघ्या साडेचार वर्षांच्या धनश्री मुजमुलेवर २६ जून रोजी हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. आता धनश्रीची फिजीओथेरपी सुरू झाली असून, ती हळूहळू चालायचा प्रयत्न करते आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याने धनश्रीच्या पालकांनाही दिलासा मिळाला आहे.औरंगाबाद येथील एका १३ वर्षांच्या मुलाचे हृदय धनश्रीला प्रत्यारोपित करण्यात आले होते. शस्त्रक्रियेच्या पंधरवड्यानंतर आता धनश्रीच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. दिवसातून दोन वेळा तिला फिजिओथेरपीचा कोर्स सुरू झाला आहे. त्यामुळे या कोर्सच्या माध्यमातून प्राथमिक स्तरावरचे काही व्यायाम तिच्याकडून करून घेतले जातात. शिवाय, तिला हळूहळू चालायला शिकविले जाते. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून समाधान मिळते, अशी प्रतिक्रिया धनश्रीचे वडील कृष्णा मुजमुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जालनाच्या सारवाडी गावच्या धनश्रीला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी हा हृदयाशी संबंधित गंभीर आजार असल्याचे निदान गेल्या वर्षीझाले. तेव्हापासून तिला महिन्यातून दोनदा रुग्णालयात दाखल करावे लागत होते.तिचे हृदय केवळ १५ टक्के कार्यरत होते. अखेर डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. त्यानुसार मुलुंड येथील रुग्णालयात तिचे हृदयप्रत्यारोपण पार पडले.तिच्यासाठी केला ‘ग्रीन कॉरिडोर’औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयातून २६ जून रोजी डॉक्टरांची चमू हृदय घेऊन दुपारी १.५० वाजता निघाली. ४.८ किलोमीटरचा रस्ता अवघ्या ४ मिनिटांत कापत १.५४ला ते विमानतळावर दाखल झाले. मुंबई विमानतळ ते मुलुंड रुग्णालय हा १८ किलोमीटरचा प्रवास केवळ १९ मिनिटांत पूर्ण करण्यात आला. विमानतळाहून ३.०५ला निघालेली डॉक्टरांची चमू ३ वाजून २४ मिनिटांनी रुग्णालयात दाखल झाली. अवघ्या दोन तासांत हे हृदय मुंबईत दाखल झाले, त्यासाठी विविध शाखांतील यंत्रणांनी मोलाचे सहकार्य केले. मुलुंडच्या रुग्णालयात ३.३० वाजता ही चमू दाखल झाली त्यानंतर प्रत्यारोपण करण्यात आले.
हृदयप्रत्यारोपण : ...अन् धनश्रीला मिळाले जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 4:51 AM