"मनाला वेदना देणारी घटना", फडणवीसांकडून शहापूर अपघाताच्या चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 09:24 AM2023-08-01T09:24:16+5:302023-08-01T09:24:46+5:30
शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना
ठाणे - जिल्ह्यातील शहापूर दुर्घटनेत आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून मदत व बचावकार्य अद्यापही सुरू आहे. या भीषण दुर्घटनेत ३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्रीच या घटनेची दखल घेत मंत्री दादा भुसे यांना घटनास्थळावर पाठवले होते. तर, प्रशासनालाही सर्वोतोपरी मदतीचे निर्देश दिले होते. आता, याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणलवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे निर्देशही दिले आहेत.
शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 3 कामगार जखमी झाले. त्यांच्यावर रूग्ण्यालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे फडणवीस यांनी ट्विट करुन सांगितले. शहापूर दुर्घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 1, 2023
या घटनेत 3 कामगार जखमी झाले.…
शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गपासून ५ ते ६ किलोमीटर ग्रामीण भागात असलेल्या सरलांबे गावच्या हद्दीत समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी काल रात्री ११ वाजल्याच्या सुमारास १७ कामगार आणि९ इंजिनियर उपस्थितीत काम सुरू असतानाच अचानक लॉन्चरसह गर्डर हे तिथे काम करणाऱ्या कामगारांवर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच सर्वांआधी स्थानिक गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं. त्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन टीम, इतर कामगांरानी मिळून क्रेनच्या साह्याने गर्डर खाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढले. अजूनही ४ ते ५ कामगार गर्डर खाली दबले असल्याची माहिती मिळत आहे. तर अद्यापही बचावकार्य सुरू असून पोलीस प्रशासन तसेच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल् असून आतापर्यत १७ कामगारांचे मृतदेह शहापूरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उत्तरणीय तपासणीसाठी रवाना केले आहे.
पंतप्रधान मोदींचे ट्विट
नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शहापूर दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. शहापूर दुर्घटनेच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले. तर, मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अजित पवारांकडूनही शोक
शहापूर तालुक्यातील सरलंबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना घडलेल्या दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पुलाचं काम सुरू असताना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्यानं हा अपघात झाला. बचावकार्य युद्धपातळीवर राबवलं जात आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो, असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे.