मुंबई - केईएम रुग्णालयात दीड महिन्यापूर्वी त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, गेल्याच महिन्यात त्यांना संसर्गाने गाठले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगरमधील ३८ वर्षीय रुग्णाच्या बाबतीत.
संबंधित रुग्णाला हृदयविकाराचा त्रास होता. तो बळावल्याने त्यांना हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला होता. केईएममध्ये त्या रुग्णाला एका मेंदूमृत महिलेच्या नातेवाइकांच्या संमतीनंतर हृदयही प्राप्त झाले होते. केईएमच्या निष्णात डॉक्टरांच्या चमूने हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी केली. ५६ वर्षानंतर प्रथमच केईएममध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाल्याने त्याची चर्चाही झाली होती. शस्त्रक्रियेनंतर बऱ्या झालेल्या या रुग्णाला घरी परत पाठविण्यात आले. मात्र, २१ ऑगस्ट रोजी त्यांना संसर्ग झाला. त्यांना स्वाइन फ्लूचे निदान झाल्याचे सांगण्यात येते. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला.