नियम पाळत दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप; ७० नैसर्गिक विसर्जन स्थळे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 01:10 AM2020-08-24T01:10:09+5:302020-08-24T01:10:24+5:30
१७० कृत्रिम तलाव, गर्दी टाळण्यासाठी फिरती विसर्जन व्यवस्था
मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया’ असे म्हणत मुंबईकरांनी श्रीगणेशाची मनोभावे पूजा केल्यानंतर रविवारी दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. नैसर्गिक विसर्जन स्थळे, कृत्रिम विसर्जन स्थळे आणि फिरती विसर्जन स्थळे येथे कोरोनाबाबतचे नियम पाळत गणेशमूर्तींचे विसर्जन केले
मुंबईत ७० नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी येथे नागरिक किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जनास मनाई केली आहे. येथे पालिकेने मूर्ती संकलनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. २४ विभागांमध्ये सुमारे १७० कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. या तलावांलगत राहणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्थळांवर जाण्यास मनाई करण्यात आली होती. त्यांनी कृत्रिम तलावाचा वापर करणे पालिकेकडून बंधनकारक करण्यात आले होते. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या काही भाविकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन घरच्याघरी बादलीत किंवा ड्रममध्ये केले.
तलावाजवळ जाण्यास मनाई
- कृत्रिम तलावांलगत राहणाºया भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्थळांवर जाण्यास मनाई करण्यात आली होती. त्यांनी कृत्रिम तलावाचा वापर करणे पालिकेने बंधनकारक केले होते. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाºया काही भाविकांनी मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी बादली किंवा ड्रममध्ये केले.
- प्रवेशद्वारावर श्रीगणेशाची पूजा करून येथे तैनात करण्यात आलेल्या स्वयंसेवकांकडून तराफ्यांद्वारे गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात होते. बहुतांश ठिकाणी कृत्रिम तलावांत मोठ्या प्रमाणावर विसर्जन करण्यात येत होते.
- नैसर्गिक असो किंवा कृत्रिम तलाव असो, प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पालिकेचे कर्मचारीही उपस्थित होते. जीवरक्षक तैनात करण्यात आले होते.
- तलावांलगत तराफे होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक ठिकाणी स्वच्छता बाळगण्यात आली होती. तलावांलगत छोटे टेबल मांडण्यात आले होते. या टेबलवर ठेवण्यात आलेल्या मूर्तींची पूजा आणि आरती केल्यानंतर येथे तैनात स्वयंसेवकांकडून तराफ्यांद्वारे मूर्ती विसर्जित केली जात होती. मास्क घालण्यासह सामाजिक अंतर पाळण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले होते. कोरोनामुळे दरवर्षीसारखा उत्साह या वर्षी कुठेही दिसून आला नाही.
- संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सार्वजनिक १२३, घरगुती ७,७९२ अशा एकूण ७,९१५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यातील कृत्रिम तलावात सार्वजनिक ८५, घरगुती ४,१३७ तर एकूण ४,२२२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
विसर्जन व्यवस्थेची पाहणी
मुंबई महापलिकचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सायन आणि वडाळा या ठिकाणी दीड दिवसांच्या गणेशमूर्तीच्या विसर्जन प्रसंगी भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. वडाळा येथील महर्षी कर्वे उद्यान, कृत्रिम तलावाची आणि शीव (सायन) तलाव येथील नैसर्गिक तलावाची व्यवस्था पाहिली. अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा सर्र्वांनी वापर करणे, गणेशमूर्तींचे संकलन करून पूर्ण पावित्र्य राखून विसर्जन करणे, अशा सूचना त्यांनी दिल्या, तसेच वैद्यकीय पथक, पोलीस यंत्रणा आणि तलावावर तैनात असलेले लाइफ गार्ड यांच्याशीही संवाद साधला.