मुंबई : बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर बुधवारी पाच दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. नैसर्गिक विसर्जन स्थळांसह कृत्रिम स्थळांवर मुंबई महापालिकेचे नियम पाळून विसर्जन करण्यात आले.
दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगर अशा सर्व ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कृत्रिम तलावांत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला,’ असे म्हणत मुंबईकरांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.मुंबईत ७० नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नैसर्गिक विसर्जन स्थळांवरील गर्दी कमी व्हावी यासाठी पालिकेच्या २४ विभागांमध्ये सुमारे १७० कृत्रिम तलावदेखील निर्माण करण्यात आले. विसर्जन स्थळी पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त होता. विसर्जन स्थळी तराफे, जीवरक्षकांची व्यवस्था केली होती. कुठेही आरोग्याशी संबंधित सुरक्षेला धोका पोहोचणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली हेती. मुंबईत संध्याकाळी ९ वाजेपर्यंत सार्वजनिक २९६, घरगुती १२६२२ अशा १२,९१८ मूर्तींचे विसर्जन झाले. यापैकी कृत्रिम तलावात सार्वजनिक मंडळाच्या २१९ तर घरगुती ७,०६४ अशा ७,२८३ मूर्तींचे विसर्जन झाले.