मुंबईत पाऊस पडूनही उकडतंय, कारण की...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 08:10 AM2024-06-21T08:10:51+5:302024-06-21T08:11:21+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात तापमानात घट; पण आर्द्रता ८० टक्क्यांच्या आसपास.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात मान्सून बऱ्यापैकी सक्रिय झाला असला तरी त्याची तीव्रता वाढलेली नाही. त्यात अधूनमधून सरी कोसळत असल्याने तापमानात घट झाली आहे. मात्र, आर्द्रता ८० टक्क्यांच्या आसपास कायम आहे. त्यामुळे एकीकडे मुंबईत पाऊस पडत असला तरी आर्द्रता कायम असल्याने मुंबईकर घामाघूम होत असल्याचे चित्र जूनच्या मध्यानंतरही कायम आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. शहर आणि पूर्व उपनगरात तुलनेत पश्चिम उपनगरात पावसाचा जोर अधिक आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेही पश्चिम उपनगरात पावसाचा जोर अधिक होता.
हवामान खात्याने गुुरुवारसाठी मुंबईत यलो ॲलर्ट जारी केला होता, पण पाऊस मुंबईच्या आकाशात दबा धरून बसला होता. आकाश कृष्णमेघांनी व्यापल्याने मुंबईकरांनी दिवसभर तिन्हीसांज झाल्याचा अनुभव घेतला. काही ठिकाणी पडलेल्या तुरळक सरींनी मात्र मुंबईकरांना चिंब केले.
पाऊस बेपत्ता असल्याचे चित्र
शहर आणि पूर्व उपनगरात दाटून आलेल्या ढगांनी काळोख केला असला तर पाऊस बेपत्ता असल्याचे चित्र होते. गुरुवारी दिवसभर असेच काहीसे वातावरण मुंबईत असताना मुंबईकर घामाघूम होत होते.
शुक्रवारचा अंदाज
शुक्रवारी शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहील. मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २६ अंशांच्या आसपास राहील.