Join us

उकाडा वाढला : घामाने आंघोळ आधी; पावसाचा शॉवर कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 12:50 PM

आर्द्रतेमुळे मुंबईकरांची अक्षरश: घामाने आंघोळ होत आहे.

मुंबई : दिवसेंदिवस आग ओतणारा सूर्य थंड होण्याचे काही नावच घेत नाही. मे महिन्यातील वाढत्या उकाड्यामुळे घामाच्या धारा लागल्या असून, मुंबईकर गर्मीने हैराण झाले आहेत. दिवसाचे तापमान सरासरी ३४ अंश असले तरी आर्द्रतेमुळे मुंबईकरांची अक्षरश: घामाने आंघोळ होत आहे. रात्रीही पारा काही कमी होण्याचे नाव घेत नसल्याने घराघरांत पंखे वेगात सुरू असल्याचेच चित्र आहे.  

मुंबईत गेल्या आठवड्यात शहर, उपनगरात ३४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. केरळात ४ जूनदरम्यान मान्सून येण्याची शक्यता असली तरी मुंबईतील उकाडा मात्र कायम आहे.  मुंबईत मान्सून १० ते १५ जूननंतरच येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून, पाऊस येईपर्यंत किमान आणखी आठवडाभर तरी मुंबईकरांना गर्मीचा सामना करावा लागणार आहे. आर्द्रतेचे सरासरी प्रमाण ६१ टक्के असल्याने घामाच्या धारा वाढल्या आहेत.

गर्दीने घामाच्या धारा वाढल्यामुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या लोकल ट्रेनला सकाळ - संध्याकाळ गर्दी असते. वाढता उकाडा, त्यात ही गर्मी यामुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवास करणे असह्य होत आहे.मुंबईतील बेस्ट बसचीही हीच परिस्थिती असल्याने आणखी काही दिवस हा त्रास सहन करावा लागणार आहे. गर्मीतून दिलासा मिळावा म्हणून एसी लोकल आणि एसी बसचा प्रवास मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

टोपी, रुमाल, छत्रीचा आसरा    कडक उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी मुंबईकर टोपी, छत्री आणि रुमालाचा आसरा घेत आहेत.    डोक्यावर रुमाल तसेच सावलीचा आडोसा शोधताना मुंबईकर दिसत आहेत.

दुपारनंतर सामसूमसकाळी ९ वाजताच ऊन प्रचंड वाढल्याने घामाच्या धारा वाहण्यास सकाळीच सुरुवात होत आहे. दुपारी गर्मी प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकर घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करीत आहेत. वाहनांशिवाय रस्त्यावर माणसांचे प्रमाण कमी दिसत आहे.

२९ मेला पावसाच्या सरीठाणे, नवी मुंबईत पावसाच्या सरी कोसळल्यानंतर मुंबईतदेखील २९ मे रोजी काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मात्र, त्यानंतर उकाडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाच्या सरी कोसळतील तेवढाच काय तो दिलासा.

टॅग्स :मुंबई