Join us

त्रासदायक उकाड्याने मुंबईकर घामाघूम; अमरावती सर्वाधिक तापली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 3:09 AM

जिथवर नजर जाईल; तिथवर ऊनच ऊन. कोरड्या वाऱ्याने घशाला पडलेली कोरड, अंगाची होणारी लाहीलाही, डोक्यावर आग ओकणारा सूर्य, डोळ्यांंना झोंबणारे उष्ण वारे, अंगाला बसणारे उन्हाचे चटके यामुळे मंगळवारीही उष्णतेची लहर आणि तापमानाचा कहर कायम होता.

मुंबई : जिथवर नजर जाईल; तिथवर ऊनच ऊन. कोरड्या वाऱ्याने घशाला पडलेली कोरड, अंगाची होणारी लाहीलाही, डोक्यावर आग ओकणारा सूर्य, डोळ्यांंना झोंबणारे उष्ण वारे, अंगाला बसणारे उन्हाचे चटके यामुळे मंगळवारीही उष्णतेची लहर आणि तापमानाचा कहर कायम होता. सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ४० अंश नोंदविण्यात आले असतानाच मंगळवारीही मुंबईचे कमाल तापमान ३९ अंशाच्या आसपास कायम राहिले. त्यामुळे त्रासदायक उकाड्याने मुंबईकर घामाघूम झाले. मंगळवारी सर्वात जास्त कमाल तापमान अमरावतील ४२.६ अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले.गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. गोव्यासह उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.मुंबईत आकाश राहणार निरभ्रमुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश बुधवारसह गुरुवारी मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३८, २४ अंशाच्या आसपास राहील.शहरांचे मंगळवारचे कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्येअकोला ४१.४, अलिबाग ३६.५, अमरावती ४२.६, बुलडाणा ३७.६, चंद्रपूर ४१.२, गोंदिया ३६.८, जळगाव ४१, कोल्हापूर ३७.४, मालेगाव ४०, मुंबई ३९.५, नागपूर ३९.८, नाशिक ३८, पुणे ३९.३, सांगली ३८.२, सातारा ३८.७, सोलापूर ४१.२, ठाणे ४०, वर्धा ४१.२, यवतमाळ ४०.६विदर्भात पावसाची शक्यता२७ ते २८ मार्च : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.२९ मार्च : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.३० मार्च : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.

टॅग्स :तापमानमुंबई