‘ताप’दायक वातावरणाने मुंबईकर हैराण

By admin | Published: March 20, 2017 02:28 AM2017-03-20T02:28:33+5:302017-03-20T02:28:33+5:30

मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २० अंशांच्या आसपास नोंदवण्यात येत असले तरीदेखील ‘ताप’दायक ऊन,

In the heat-stricken environment, Mumbai and Haraan | ‘ताप’दायक वातावरणाने मुंबईकर हैराण

‘ताप’दायक वातावरणाने मुंबईकर हैराण

Next

मुंबई : मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २० अंशांच्या आसपास नोंदवण्यात येत असले तरीदेखील ‘ताप’दायक ऊन, कोरडे वारे आणि घाम फोडणारा उकाडा; अशा घटकांमुळे मुंबईकरांना उन्हाळा अधिकच जड जात
आहे. विशेषत: सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पडणारे कडाक्याचे ऊन मुंबईकरांना चांगलेच चटके देत असून, कोरडे वारे मुंबईकरांच्या घशाला कोरड पाडत आहे.
मार्च महिन्याच्या मध्यातच कहर केलेल्या उन्हाचा पारा दिवसागणिक अधिकच वाढणार असून, तापदायक उन्हामुळे मुंबईकर अधिकच त्रस्त झाले आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजानुसार २०१७ च्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी उन्हाळ्याची सुरुवात लवकर झाली आहे. या कारणास्तव उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबतच्या सूचना राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने यापूर्वीच दिल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे मुंबईचा पारा ३४ अंशांवर स्थिर असला तरीदेखील वाढता उकाडा, तापदायक ऊन लक्षात घेता आता मुंबई महापालिकेनेही उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
ऋतू बदलाच्या काळात वाऱ्याची दिशा बदलत असते. ईशान्येसह पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा सातत्याने बदलत असते. अशा वेळी समुद्राहून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रवाह दिशा बदलणाऱ्या वाऱ्यामुळे थोपवला जातो. मुंबई शहरावर समुद्राहून वाहणारे वारे ऐन सकाळी स्थिर होण्यास विलंब होतो. नेमके दुपारी हे वारे स्थिर होत असल्याने वारे तप्त होतात. तप्त वारे आणि ऊन मुंबईकरांना अधिकच घाम फोडत असल्याचे चित्र मुंबईत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान वाढण्यास सुरुवात झाली.
फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानात सातत्याने वाढ होत राहिली. कमाल तापमान थेट ३८ अंशांवर पोहोचले. तर मध्यंतरी किमान तापमानात घट नोंदवण्यात आली. परिणामी दिवसा ऊन अणि रात्री थंडी असे काहीसे चित्र निर्माण झाले.
विशेषत: वातावरणात झालेल्या बदलाचा अधिकच त्रास जाणवू लागला आणि आता तर उन्हाचा जोर अधिकच वाढल्याने मुंबई आणखी तापली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारीसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: In the heat-stricken environment, Mumbai and Haraan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.