बलुचिस्तानातील उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:10 AM2018-04-26T00:10:55+5:302018-04-26T00:10:55+5:30
दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशावर स्थिर असले तरीदेखील समुद्री वारे स्थिर होण्यास दुपार होत असल्याने मुंबई तापत असल्याचे चित्र आहे.
मुंबई : दक्षिण राजस्थान आणि बलुचिस्तानातील भागातून उष्ण आणि कोरडे वादळ व वारे उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाकडे वाहत आहेत. परिणामी, येथील कमाल तापमान ४० अंशापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त नोंदविण्यात येत असतानाच आता २६ ते २८ एप्रिलदरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशावर स्थिर असले तरीदेखील समुद्री वारे स्थिर होण्यास दुपार होत असल्याने मुंबई तापत असल्याचे चित्र आहे.
स्कायमेटकडील माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये गरम व कोरडे हवामान आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिउष्ण वातावरण आहे. विदर्भातील काही भागांमधे पाºयाचे प्रमाण वाढते असून ते ४० अंशापर्यंत नोंदविण्यात येत आहे. उष्ण, कोरडे वारे, वादळामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमान आणखी वाढेल. परिणामी परभणी, चंद्रपूर, अकोला, वर्धा, नांदेड, जळगाव येथील हवामान उष्ण राहील. कोकणातील तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त राहील. येथे कमाल तापमानाची नोंद ३० अंशापेक्षा जास्त असेल. तथापि, सागरी किनारपट्टी प्रदेश असल्याने, हवामान गरम आणि असह्य असेच राहील. सागरी किनारपट्टीजवळील भागात म्हणजे मुंबई, डहाणू, रत्नागिरी, महाबळेश्वर येथे हवामान उष्ण आणि दमट राहील. निरभ्र आकाशामुळे हवामान गरम आणि कोरडे राहील.
मुंबई ३५ अंशावर; विदर्भात उष्णतेची लाट
गुरुवारसह शुक्रवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २३ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. २६ ते २८ एप्रिलदरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशाराही हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.