हिल स्टेशनलाही उष्णतेच्या लाटेचा तडाखा; लोणावळा ३७ अंश सेल्सिअस
By सचिन लुंगसे | Published: April 19, 2023 03:18 PM2023-04-19T15:18:18+5:302023-04-19T15:19:11+5:30
मुंबईतही कमाल तापमानाचा पारा ३७ अंश नोंदविण्यात आला असून, शनिवारपर्यंत मुंबईसह राज्यभरात कमाल तापमानाचा पारा चढाच राहील, अशी माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडीया यांनी दिली.
मुंबई : उत्तर भारतातील काही जिल्हयांत आलेल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हे उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाले आहेत. विशेषत: लोणवळ्यासारख्या हिल स्टेशनलाही उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला असून, येथे कमाल तापमानाची नोंद ३७ अंश सेल्सिअस झाली आहे.
मुंबईतही कमाल तापमानाचा पारा ३७ अंश नोंदविण्यात आला असून, शनिवारपर्यंत मुंबईसह राज्यभरात कमाल तापमानाचा पारा चढाच राहील, अशी माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडीया यांनी दिली. आता उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असून, मुंबईसह राज्यभरात शनिवारपर्यंत कमाल तापमान चढे राहण्याची शक्यता आहे. रविवारनंतर हवामानात पुन्हा बदल होतील, असेही कपाडीया यांनी सांगितले.
कोणते जिल्हे होरपळत आहेत ?
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती होती. रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली, धुळे, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्हयांत ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे, असे सतर्ककडून सांगण्यात आले.
दुपारी १२.३० वाजता / कुठे किती तापमान (स्त्रोत : वेगरिज ऑफ दी वेदर)
मुंबई ३७
लोणावळा ३७
ठाणे ३९
कर्जत ४४