मुंबईत उष्णतेची लाट; बहुतांश ठिकाणी ३६ ते ४० तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 06:29 AM2022-03-14T06:29:27+5:302022-03-14T06:29:43+5:30

१४ ते १७ मार्चदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. 

Heat wave in Mumbai; Temperatures of 36 to 40 degrees Celsius were recorded in most places | मुंबईत उष्णतेची लाट; बहुतांश ठिकाणी ३६ ते ४० तापमानाची नोंद

मुंबईत उष्णतेची लाट; बहुतांश ठिकाणी ३६ ते ४० तापमानाची नोंद

googlenewsNext

मुंबई :  गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकर उष्णतेच्या लाटेचा सामना करत असून, बुधवारपर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मार्च महिन्यातच उष्णतेच्या लाटेने कहर केल्याने एप्रिल आणि मे महिन्यात काय होईल? या विचारानेच मुंबईकरांना घाम फुटल्याचे चित्र रविवारी होते. 

सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मुंबईवर तळपणारा सूर्य अक्षरश: आग ओकत आहे आणि मुंबईकरांच्या घामाच्या धारा वाहात आहेत. याला कारण आहे उष्णतेची लाट. मुंबई महानगर प्रदेशात रविवारी बहुतांश ठिकाणी ३६ ते ४० अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली.

१४ ते १७ मार्चदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविले आहे.

१४ मार्च रोजी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. मुंबईकरांनी काळजी घ्यावी. शक्यतो घरी थांबावे. बाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली ठेवावी. भरपूर पाणी प्यावे. हवा खेळती राहील यावर भर द्यावा.
- कृष्णानंद होसाळीकर,  वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवामान, शास्त्र विभाग

Web Title: Heat wave in Mumbai; Temperatures of 36 to 40 degrees Celsius were recorded in most places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.