पंधराहून अधिक राज्यांत पसरली उष्णतेची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 06:10 AM2019-05-30T06:10:50+5:302019-05-30T06:11:02+5:30

अंदमानात दाखल झालेला मान्सून पुढे सरकरण्याचे नाव घेत नसून, दुसरीकडे आग ओकणाऱ्या उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे.

The heat wave spread over more than 15 states | पंधराहून अधिक राज्यांत पसरली उष्णतेची लाट

पंधराहून अधिक राज्यांत पसरली उष्णतेची लाट

googlenewsNext

मुंबई : अंदमानात दाखल झालेला मान्सून पुढे सरकरण्याचे नाव घेत नसून, दुसरीकडे आग ओकणाऱ्या उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. केवळ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भच नाही, तर निम्मा देश उष्णतेच्या लाटेने होरपळत आहे. ‘स्कायमेट’च्या माहितीनुसार, १५पेक्षा अधिक राज्यांत उष्णतेची लाट असून, कमाल तापमान ४५ अंशाहून अधिक नोंदविण्यात येत आहे. चंद्रपुरात बुधवारी कमाल तापमान ४८ अंश नोंदविले गेले. राज्यातील यंदाचे हे उच्चांकी तापमान आहे.
‘स्कायमेट’च्या म्हणण्यानुसार, पुढील आठवडाभर उत्तरेपासून पूर्व आणि मध्य भारतापासून दक्षिणेपर्यंत कमाल तापमान वाढीवच राहील. गेल्या २४ तासांत तेलंगणमध्ये १२ हून अधिक ठिकाणी कमाल तापमानाची नोंद ४६ ते ४७ अंश झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, विदर्भ, तेलंगण, उत्तरी कर्नाटक, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, हरयाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये आणखी काही दिवस उष्ण आणि कोरडे वारे वाहतील. कमाल तापमान ४५ ते ४७ अंश नोंदविले जाईल.
>मान्सून अंदमानात खोळंबला
मान्सूनची हालचाल सुस्तावली असून, तो केरळमध्ये दाखल होण्यास आठवडा लागेल. त्यामुळे किमान एक आठवडा तरी मान्सून पूर्व सरी कोसळणार नाहीत. मान्सून केरळमध्ये दाखल झाला, तरी तेलंगणसह देशाच्या मध्य भागात जूनच्या पहिल्या आठवड्यात तापमान उष्ण राहील. देशाच्या पूर्वेकडील भागात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत. परिणामी, त्रिपुरामध्ये अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे. येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.
>राज्यासाठी अंदाज
३० मे : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येईल.
३१ मे : विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.
१ आणि २ जून : विदर्भात उष्णतेची लाट येईल.
>मुंबईसाठी अंदाज
३० आणि ३१ मे : मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २७ अंशाच्या आसपास राहील.
राज्यातील शहरांचे तापमान : अकोला ४५.७, अमरावती ४६.४, बुलडाणा ४२.६, ब्रह्मपुरी ४७.५, चंद्रपूर ४८, गडचिरोली ४४.१, गोंदिया ४३.५, नागपूर ४६, वर्धा ४६.९, वाशिम ४४,यवतमाळ ४५.५

Web Title: The heat wave spread over more than 15 states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.