मुंबई : मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाने अवेळी हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची नोंद झाली असून, मुंबईत महालक्ष्मी, वरळी, चिंचपोकळी आणि लोअर परळ परिसरात पावसाने तुरळक हजेरी लावली. महत्त्वाचे म्हणजे अवेळी पाऊस पडत असतानाच दुसरीकडे वाढत्या कमाल तापमानानेही कहर केल्याने नागरिक हैराण झाले आहेत.एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली. विशेषत: विदर्भात बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे, तर ठिकठिकाणी पावसानेही हजेरी लावली. परिणामी बदलत्या वातावरणाने नागरिक हैराण झाले आहेत.दरम्यान, भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले असल्याची माहितीही हवामान शास्त्र विभागाने दिली.दरम्यान, १५ आणि १६ एप्रिल रोजी मुंबईत आकाश मुख्यत: ढगाळ राहील. संध्याकाळी आणि रात्री ढगांचा गडगडाट होईल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.
उष्णतेची लाट, पावसाचीही अवेळी हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 6:33 AM