उष्णतेच्या लाटा, प्रकृतीस धोका; कोकणासाठी चौथा इशारा, सरासरीपेक्षा तापमानाची पातळी वर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 12:44 PM2023-05-15T12:44:43+5:302023-05-15T12:45:49+5:30
राज्याला सध्या उच्च तापमानाचा सामना करावा लागत आहे. पारा सरासरी पातळीपेक्षा वर गेला असून, आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणारी स्थिती आहे.
मुंबई : मुंबई, पालघर, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ येथे उष्णतेची लाट असून, या मोसमात कोकणासाठी उष्णतेच्या लाटांचा हा चौथा इशारा आहे, तर मे महिन्यातील पहिला आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन आठवड्यांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदविण्यात येत असून, या वर्षात दुसऱ्यांदा कोकण किनारपट्टीलगत उष्णतेचे प्रमाण तीव्र झाल्याचे दिसून आले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांचे अनेक इशारे दिले जात आहेत.
राज्याला सध्या उच्च तापमानाचा सामना करावा लागत आहे. पारा सरासरी पातळीपेक्षा वर गेला असून, आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणारी स्थिती आहे.
काय केले पाहिजे?
दीर्घकालीन धोरणांच्या दृष्टीने गतिमान वातावरणीय घडामोडींच्या आधारावर जिल्हा पातळीवरील हिट ॲक्शन प्लानचे परीक्षण करणे गरजेचे आहे.
वाढत्या उष्णतेच्या लाटा आणि त्यांच्या वारंवारतेचा सामना करण्यासाठी एक धोरण असण्याची हमी देणे गरजेचे आहे.
उष्णतेच्या लाटांचे इशारे वारंवार मिळत असल्याने दीर्घकालीन उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. यासाठी शहरांमध्ये सावलीच्या जागा वाढविणे किंवा पाणपोया व गारव्याचे इतर प्रकार उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे आहे.
- आदित्य पिल्लई, असोसिएट फेलो, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च.
मोचा चक्रीवादळामुळे पश्चिमी वाऱ्यांवर परिणाम होईल, ज्यामुळे उत्तर आणि मध्य भारत आणि किनारपट्टीवरील भागात उष्णतेच्या लाटा अधिक प्रमाणात निर्माण होतील. कोकण किनारपट्टीवर सध्या आपण तसे चित्र पाहतो. उच्च तापमान फार काळ टिकणार नाही. मध्य भारत आणि महाराष्ट्रातील काही भागांतून पुढील चार ते पाच दिवसांत तापमान कमी होईल.
- माधवन नायर राजीवन, माजी सचिव, पृथ्वी विज्ञान मंत्रालय
- उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि या परिस्थितीमुळे प्रभावित होणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षेच्या निश्चितीसाठी यंत्रणांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा आणि आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा, अशा सूचना अभ्यासकांनी केल्या आहेत.
दीड अंश सेल्सिअसने वाढणार
शतकाच्या मध्यापर्यंत पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सियसने वाढण्याची शक्यता आहे. ऋतुचक्र पूर्णपणे विस्कळीत होत असून, शेतीसह अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. शासनाने हिट ॲक्शन स्ट्रॅटेजीमध्ये सर्व बाबींचा समावेश करणे गरजे आहे. वाढत्या उष्म्याचे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या मूल्यांकनास प्राथमिकता द्यावी.
- डॉ.अंजल प्रकाश, लेखक, आयपीसीसी अहवाल.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मुंबईतील तापमान ३५ अंश सेल्सिअसहून अधिक होते आणि काही भागांमध्ये सापेक्ष आर्द्रता ८० % हून अधिक होती. याचा अर्थ हा की, शहरातील उष्णता निर्देशांक ५० अंश सेल्सिअसहून अधिक होते. किनारपट्टीतील तापमान ३५ अंशांहून अधिक असणे धोकादायक असते. - लुबैना रंगवाला, सहायक संचालक, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट.