संपूर्ण कोकणाला उष्णतेच्या लाटेचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 07:04 AM2021-03-28T07:04:07+5:302021-03-28T07:04:07+5:30
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट जाणवत आहे.
मुंबई : गुजरात आणि मुंबईसह संपूर्ण कोकणात शनिवारीही उष्णतेची लाट कायम होती. मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या शहरांसह उर्वरित शहरांच्या कमाल तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सियसवर दाखल झाला असून, पुढील पाच दिवस संपूर्ण कोकणासह राज्यभरात बहुतांश जिल्ह्यांत कमाल तापमान चढेच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट जाणवत आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ६ अंशांची वाढ नोंदविण्यात येत असून, पालघर आणि रत्नागिरी येथे कमाल तापमान तब्बल ४० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येत आहे. पुढील ५ दिवस संपूर्ण राज्यभरात हवामान कोरडे राहील, तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक येथील हवामान उष्ण नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली.