मुंबई : गुजरात आणि मुंबई सह संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट शनिवारी देखील कायम होती. मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या शहरांसह उर्वरित शहरांच्या कमाल तापमानाचा पारा ३८ अंशावर दाखल झाला असून, पुढील पाच दिवस संपूर्ण कोकणासह राज्यभरात बहुतांशी जिल्ह्यात कमाल तापमान चढेच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (Heat Wave in Konan Region. Mumbai, Raigad, Ratnagiri, sindhudurg, palghar Districts.)
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट जाणवत आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ६ अंशांची वाढ नोंदविण्यात येत असून पालघर आणि रत्नागिरी येथील कमाल तापमान कहर केला आहे. हे कमाल तापमान ४० अंश एवढे नोंदविण्यात येत असून, दिवस संपूर्ण राज्यभरात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिक येथील हवामान पुढील पाच दिवस उष्ण नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
शनिवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास मुंबईत कमाल तापमानाची नोंद ३९ अंश सेल्सिअस एवढी झाली आहे. मुंबईला आजचा दिवस येथील उष्ण नोंदवण्यात आला असून ठाण्यात देखील फार काही वेगळी परिस्थिती नव्हती. दुपारी चार वाजेपर्यंत बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाने ३८ अंशाचा पारा पार केला होता.
दरम्यान, राज्यभरात यापूर्वी अवकाळी पावसाने कहर केला असून बहुतांश ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. त्यात आता मार्च महिन्यातच दाखल झालेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिकांना चटके दिले असून एप्रिल आणि मे महिन्यात यात आणखी वाढ नोंदविण्यात येईल, अशी शक्यता देखील हवामान खात्याने वर्तविली आहे.