महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानात उष्णतेच्या तप्त लाटा; स्कायमेटचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 03:45 AM2020-05-08T03:45:41+5:302020-05-08T07:12:21+5:30
महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान गेल्या तीन दिवसांपासून ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या आसपास असून, तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊसही कोसळत आहे
मुंबई : देशात अद्याप मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या लाटा वाहत नसल्या तरी बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४० ते ४४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. हाच कमाल तापमानाचा पारा ४४ अंशाच्या आसपास राहिला तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानात उष्णतेच्या लाटा जाळ काढतील, असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान गेल्या तीन दिवसांपासून ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या आसपास असून, तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊसही कोसळत आहे. परिणामी, महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि उन्हाचा कहर, असे दुहेरी वातावरण पाहण्यास मिळत आहे.
विदर्भात पाऊस
विदर्भात गेल्या २४ तासांत तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झालीे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय तर कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.