उष्णतेच्या लाटा जाळ काढणार; पारा चाळीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:26 PM2020-03-31T17:26:39+5:302020-03-31T17:27:53+5:30
सोलापूर, जळगाव आणि बीड येथील कमाल तापमान ३९ अंश नोंदविण्यात आले.
सध्या महाराष्ट्र ३९ अंशावर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमानाचा पारा वाढू लागला आहे. सोलापूर, जळगाव आणि बीड येथील कमाल तापमान ३९ अंश नोंदविण्यात आले असून, मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश नोंदविण्यात येत आहे. उर्वरित शहरांचे कमाल तापमान ३५ अंश एवढे नोंदविण्यात येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे एप्रिल, मे आणि जून महिन्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, यंदाचा उन्हाळा आणखी तापदायक असणार आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाची नोंद ४० अंश होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळच्या उन्हाळ्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ०.५ ते १ अंशाने अधिक नोंदविण्यात येईल. किमान तापमानाची देखील हीच स्थिती नोंदविण्यात येईल. किमान तापमानात सरासरी ०.५ ते १ अंश एवढी वाढ नोंदविण्यात येईल. या व्यतिरिक्त उष्णतेच्या लाटा देखील वेगाने वाहतील. पूर्व पश्चिम राजस्थान, पश्चिम मध्यप्रदेश, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर दक्षिण कर्नाटक आणि लगतच्या परिसरात कमाल तापमानात अधिकची वाढ नोंदविण्यात येईल. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तरप्रदेश, झारखंड आणि विदर्भात कमी अधिक फरकाने हीच परिस्थिती राहील. काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंश नोंदविण्यात येईल. मध्य भारतात ही परिस्थिती अनुभवास येईल.
दरम्यान, मुंबईचे कमाल तापमान सध्या ३४ अंश नोंदविण्यात येत असले तरी आता यात देखील वाढ नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.