मुंबई : जागतिक स्तरावर तापमानाची वाढ होत राहणार असल्याचा अंदाज इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या अहवालात मांडला असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही जाणवणार आहे. उच्च तापमानामुळे उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ होऊ शकते आणि महाराष्ट्राला हा आरोग्याचा गंभीर धोका असू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
वातावरण बदलामुळे पूर येण्याचा धोका वाढणार असल्याचा इशाराही अहवालात देण्यात आला आहे. महाराष्ट्राने मागील काही वर्षांमध्ये अतिवृष्टी व महापूर अनुभवले आहेत. भविष्यात ही स्थिती नेहमीचीच होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वातावरण बदलाला सामोरे जाण्यासाठीच्या उपाययोजना आणि संकट आयपीसीसीच्या सिंथेसिस रिपोर्टने अधोरेखित केले असून, शासन, व्यावसायिक, नागरिक आणि वैयक्तिक स्तरावरील सर्व घटकांकडून महत्त्वाकांक्षी पावले उचलण्याचे महत्त्वही अहवालाने अधोरेखित केले आहे.
वातावरण बदलामुळे जगाच्या अनेक भागांत दुष्काळाचा धोका निर्माण होईल. यावर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. पर्जन्यमानातील कोणत्याही स्वरूपाच्या बदलामुळे शेती आणि घरगुती तसेच उद्योगधंद्यांसाठीच्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्र हे एक प्रमुख कृषी राज्य आहे. तापमान आणि पर्जन्यमानाच्या पद्धतीतील बदलांचा पीक उत्पादनावर आणि अन्नसुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, असे हा अहवाल म्हणतो.
शाश्वत जल व्यवस्थापन पद्धती अवलंबण्याची गरज आहे. जेणेकरून पाणीटंचाईची समस्या हाताळता येईल. अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी सवलत दिली पाहिजे. शेती, वाहतूक आणि उद्योगांमध्ये शाश्वत कार्यपद्धतीचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन द्यावे. - डॉ. अंजल प्रकाश, संशोधन संचालक, भारती इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी
तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवता येऊ शकते. पण, २०३० पर्यंतच्या ‘ग्लोबल ॲक्शन प्लेज’ची सध्याची व्याप्ती आणि वेग पुरेसा नाही. - प्रा. जॉयश्री रॉय, एनर्जी इकॉनॉमिक्स प्रोग्रॅम