मुंबई : साठलेल्या पाण्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होते. यामुळे महापालिका पावसाळ्याच्या आधीपासूनच घरांत, आजूबाजूच्या परिसरात पाणी साठू देऊ नका, अशी जनजागृती करते. पण तरीही सप्टेंबर महिन्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. महापालिका काळजी घेत असूनही शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमुळे मुंबईकरांना ताप चढत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. शहरात अनेक ठिकाणी पुनर्बांधणी, इमारत बांधणीचे काम सुरू आहे. अशा साइट्सवर अनेक ठिकाणी पाणी साचून राहते. अनेकदा अशा प्रकारच्या साठलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. यामुळे मुंबईकरांना डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा धोका अधिक असल्याचे मत वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयातील फिजिशियन डॉ. शैलजा सिंग यांनी व्यक्त केले. डॉ. सिंग यांनी पुढे सांगितले, शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. महापालिका आणि खासगी रुग्णालयात डेंग्यूचे आणि मलेरियाचे रुग्ण दाखल आहेत. गेल्या काही वर्षांतच डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. डेंग्यूच्या डासांची पैदास ही स्वच्छ पाण्यात होते. घरात झाडे असल्यास डेंग्यूच्या डासांची पैदास घरात होण्याचा धोका अधिक असतो. शहरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या बांधकामाच्या ठिकाणी बिल्डर व्यवस्थित लक्ष देत नाहीत. यामुळे या ठिकाणी होणाऱ्या डासांची पैदास मुंबईकरांना आजारी पाडत आहे. शहरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकामाच्या ठिकाणी साठलेल्या पाण्यात मलेरियाच्या डासांची पैदास होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे महापालिका या साइट्सवर कडक लक्ष ठेवून आहे. या साइट्सवर पाणी साचणार नाही, याकडे बिल्डरांना विशेष लक्ष द्यायला सांगितले जाते. याबरोबरीने कीटकनाशक विभागाचे अधिकारी या साइट्सवर जाऊन तपासणी करतात. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची तपासणी केली जाते. पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊ नये, म्हणून सर्व उपाययोजना महापालिका करत असल्याची माहिती साथरोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुख डॉ. मिनी खेतरपाल यांनी दिली. -------पाणी साठलेल्या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी महापालिका सदैव कार्यरत असते. पण या कामात लोकांचा सक्रिय सहभाग असण्याची आवश्यकता आहे. महापालिकेने यंदा डासांची पैदास होणारी ठिकाणे शोधून काढण्यासाठी काही व्यक्तींना प्रशिक्षित केले होते. पण त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे दिसून आले नाही. अनेक जणांनी इमारतीतदेखील याचा उपयोग न केल्याचे दिसून आले. अजूनही काही उच्चभ्रू सोसायटींमध्ये पालिका अधिकाऱ्यांना प्रवेश नाकारला जातो. अशा प्रकारे लोक वागत असल्यामुळे डासशोधक पथकाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
बांधकामाधीन इमारतींमुळे ‘ताप’
By admin | Published: September 30, 2015 12:51 AM