पावसाचे दमदार आगमन, मराठवाडा, विदर्भात हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 05:59 AM2020-06-13T05:59:46+5:302020-06-13T05:59:52+5:30

मराठवाडा, विदर्भात हजेरी : खरिपाच्या पेरण्यांची लगबग सुरू

Heavy arrival of rains, presence in Marathwada, Vidarbha | पावसाचे दमदार आगमन, मराठवाडा, विदर्भात हजेरी

पावसाचे दमदार आगमन, मराठवाडा, विदर्भात हजेरी

Next

मुंबई/औरंगाबाद : महाराष्ट्रात दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी मान्सूनने विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत मुसंडी मारली आहे. त्यामुळे कोकणासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी सलग दुसºया दिवशी दमदार पाऊस झाला. नाशिक परिसरातही पावसाने हजेरी लावली. मृगाच्या सरींची ही दमदार सलामी लक्षात घेऊन शेतकऱ्यांची खरीपाच्या पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. येत्या २४ तासांत मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मराठवाड्यात सलग दुसºया दिवशी पाऊस झाला. बीड जिल्ह्यात वीज पडून बहिण-भावाचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस होत असून सकाळी ८ वाजेपर्यंत २२.८७ मि.मी. पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात २३़५३ मि़मी़ पावसाची नोंद झाली होती़ जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यात मोरवड येथे वीज कोसळून अशोक विष्णूपंत अंडील (१७) व पूजा विष्णूपंत अंडील (१६) हे बहिण- भाऊ ठार झाले. विदर्भातील अनेक भागात शुक्रवारी मान्सूनचे आगमन झाले. यात प्रामुख्याने गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक ८३.२ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. यासोबतच यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर येथे पावसाची नोंद झाली.

मुसळधार पावसाचा अंदाज
मान्सूनने आगेकूच सुरु ठेवली असून, आता विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत मुसंडी मारली आहे. येत्या २४ तासांत मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. येत्या ४८ तासांत मान्सून मुंबईत दाखल होईल.

नाशिकला सरी
नाशिकला पावसाने सुमारे तीन तास झोडपले. गोदावरीला पूर आला होता. नांदूरमधमेश्वर धरणातून १ हजार ६१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला.

Web Title: Heavy arrival of rains, presence in Marathwada, Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.