इंजिनाला धनुष्यबाणाचे कडवे आव्हान
By admin | Published: November 17, 2016 06:31 AM2016-11-17T06:31:25+5:302016-11-17T06:31:25+5:30
दादर, माहीम आणि धारावीचा समावेश असणाऱ्या जी-नॉर्थ वॉर्डातील निवडणूक दंगल यंदा विशेष लक्षवेधी असणार आहे. ज्या दादरमधून
गौरीशंकर घाळे / मुंबई
दादर, माहीम आणि धारावीचा समावेश असणाऱ्या जी-नॉर्थ वॉर्डातील निवडणूक दंगल यंदा विशेष लक्षवेधी असणार आहे. ज्या दादरमधून शिवसेनेने मराठीच्या राजकारणाला सुरुवात केली तेथेच मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले. यंदा मनसे आपल्या जागा राखणार की शिवसेना पराभवाची परतफेड करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसेच्या मराठी झंझावाताने २०१२च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अनेक ठिकाणी मार दिला होता. त्यातील जिव्हारी लागलेली जखम ठरली जी-नॉर्थमधील पराभव. शिवसेना भवन, शिवाजी पार्क ज्या परिसरात आहे तेथूनच शिवसेनेला हद्दपार व्हावे लागल्याची सल ‘मातोश्री’ला दीर्घकाळ सलत राहिली. एकीकडे मनसेचा झंझावात तर दुसरीकडे स्थानिक राजकारणामुळे काँग्रेसवासी झालेले सदा सरवणकर याची जबर किंमत शिवसेनेला मोजावी लागली होती. २०१२च्या निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. सदा सरवणकर स्वगृही अर्थात शिवसेनेत परतले. तर गेल्या वेळी लाटेवर स्वार झालेल्या मनसेसमोर स्वत:चे अस्तित्व टिकविण्याचे मोठे आव्हान आहे.
गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने जाणीवपूर्वक या भागातील पक्षसंघटना मजबूत केली. दुरावलेल्या शिवसैनिकांना जवळ करण्याच्या मोहिमेने येथील शाखा पुन्हा गजबजून गेल्याचे चित्र आहे. त्याच जोरावर यंदा पुन्हा भगवा फडकविण्याचा शिवसेनेचा मनसुबा आहे.
मनसेच्या इंजिनासमोर अनेक अडचणी आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदा राज ठाकरे आणि पर्यायाने मनसेची लाट नाही. त्यातच मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षणाचा सर्वाधिक फटका मनसे नगरसेवकांना बसला आहे. संदीप देशपांडेंसारख्या दिग्गज उमेदवारांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागत आहे. प्रभाग आरक्षित झाला, पाच वर्षे जपलेला भाग, मतदार शेजारच्या प्रभागात गेला अशा अनेक अडचणी मनसेसमोर आहेत. त्यातच येथील ११ पैकी ७ प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने मनसेच्या पाचपैकी चार नगरसेवकांची अडचण झाली आहे.
तर धारावी, माहीम भागात मात्र शिवसेना-मनसे अशी विभागणी नसेल. येथील मिश्र वस्ती आणि बहुरंगी लढत यंदाही कायम राहील. काँग्रेस, आरपीआय, समाजवादीसह एक अपक्ष येथून विजयी ठरले होते. समाजवादीसमोर यंदा एमआयएमचे आव्हान असणार आहे. पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक घटकच येथे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
दादर पश्चिमेचा परिसर अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापून गेला आहे. या परिसरातील फुटपाथ केव्हाच फेरीवाल्यांनी गिळंकृत केले असून आता थेट रस्त्यावरच दुकाने थाटली जातात. त्यामुळे आधीच गजबजलेल्या या परिसरात वाहतूककोंडींच्या समस्येने कळस गाठला आहे. पादचाऱ्यांना तर रस्त्यांवरील वाहनांच्या दाटीतून आपला मार्ग काढावा लागतो. शिवाजी पार्क येथे शिवसेना आणि मनसेने मोठा गाजावाजा करत वायफाय सेवा सुरू केली. त्यावरून बरेच राजकारणही झाले. आता मात्र या वायफायचा मागमूसही सापडत नाही.
धारावी पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित आहे. याबाबत अनेक घोषणा झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात काही घडत नसल्याची लोकांची तक्रार आहे. जोपर्यंत पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत धारावीच्या समस्या संपण्याची शक्यता नाही. त्यातच केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे चर्मोद्योगासारख्या उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय येथील रस्ते अतिक्रमणाने व्यापून गेले आहेत.
या वॉर्डात नेचर पार्क, धारावी आगार, नाईकनगर, लक्ष्मी बाग, इंदिरानगर, राजीव गांधीनगर, श्रमिक विद्यापीठ, एक्सेला बॅटरी कंपनी, मुकुंदनगर पूर्व, धारावी गाव पूर्व, शाहूनगर, नवरंग कम्पाउंड, शम्मीनगर, शेठवाडी, आर.पी. नगर, भाटियानगर, हनुमाननगर, लेबर कॅम्प, नवजीवन कॉलनी, वांजावाडी, गीतानगर, व्हीएसएनएल कॉलनी, सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी सिंधी कॉलनी, शिवाजी पार्क, दादर पश्चिम, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कामगार क्रीडा केंद्र आदी परिसराचा या वॉर्डात समावेश होतो. त्यामुळे यंदा यंदा मनसे आपल्या जागा राखणार की शिवसेना पराभवाची परतफेड करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे गेल्या वेळी लाटेवर स्वार झालेल्या मनसेसमोर अस्तित्व टिकविण्याचे मोठे आव्हान आहे.
२०१२च्या निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवार-
वॉर्डविजयी उमेदवार प्राप्त मतेपराभूत उमेदवार प्राप्त मते
१७५ बोरा सुब्बरेड्डी, आरपीआय३४३०महेंद्र शिंदे, काँग्रेस ३२०६
१७६ अनुषा कदम, शिवसेना ८९३७ गंगा माने, काँग्रेस ८१४८
१७७ राजेंद्र सूर्यवंशी, शिवसेना ७६७६ दीपक काले, काँग्रेस ६६७९
१७८वकील शेख, काँग्रेस ९३१४ भूपेंद्र महाले , शिवसेना ९२४६
१७९ज्योत्स्ना परमार, समाजवादी ८०२८ सुमन कादर, काँग्रेस ५९८४
१८० विष्णू गायकवाड, अपक्ष ४४५३ प्रकाश दोंडे, काँग्रेस ३०५४
१८१ श्रद्धा पाटील, मनसे ७५५४ जयश्री तारे, शिवसेना ६१८६
१८२ वीरेंद्र तांडेल, मनसे ५०८८ समाधान सरवणकर, काँग्रेस ४८८१
१८३ मनिष चव्हाण, मनसे १२६७६ मिलिंद वैद्य ८७६५
१८४ सुधीर जाधव, मनसे ९३५२ यशवंत विचारे, शिवसेना ६६४५
१८५ संदीप देशपांडे, मनसे १३४५३ प्रवीण शेट्टे ७१९०