पावसाचा जोरदार तडाखा; मुंबईत मुसळधार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:06 AM2021-09-23T04:06:49+5:302021-09-23T04:06:49+5:30
मुंबई : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. ...
मुंबई : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात अधिक पाऊस कोसळला असून, सकाळच्या तुलनेत दुपारी अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. अधून मधून विश्रांती घेत असलेला पाऊस मोठ्या सरींसोबत कोसळत असल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे. आठवडाभर मुंबईत पावसाचे असेच चित्र राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितले की, वातावरणात झालेले बदल, वाऱ्याच्या दिशा आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईच्या उपनगरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. येत्या ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे २४ आणि २५ सप्टेंबर रोजी पश्चिम बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल.
दुपारी साडेतीननंतरदेखील पावसाचा जोर मुंबईत कायम होता. उपनगर आणि शहरात अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. कुर्ला, घाटकोपर, विद्याविहार, बीकेसी, साकी नाका येथील परिसरात पाऊस सातत्याने का होईना कोसळत होता. अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. दुपारचे ४ वाजले तरीदेखील मुंबईत पावसाचा तुफान मारा सुरू असल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे सायंकाळी आकाशात पावसाच्या ढगांनी केलेली गर्दी मुंबईकरांना धडकी भरवत होती. काही ठिकाणी अगदीच मोकळीक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असल्याने सप्टेंबरच्या उत्तरार्धातदेखील पावसाने मुंबईकरांना गारेगार केले होते.