फटाकेबंदीला हरताळ! मुंबई आणि परिसरात फटाक्यांचा दणदणाट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 12:32 AM2018-11-08T00:32:51+5:302018-11-08T09:00:39+5:30
सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने यंदाच्या दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांचा आवाज कमी होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र बुधवारी लक्ष्मीपूजनानंतर अनेकांनी फटाकेबंदील अक्षरश: हरताळ फासला.
मुंबई - रात्री 8 ते 10 या कालावधीतच फाटके फोडण्याची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने घातल्याने यंदाच्या दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांचा आवाज कमी होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र बुधवारी लक्ष्मीपूजनानंतर अनेकांनी फटाकेबंदील अक्षरश: हरताळ फासला. सुशिक्षिक आणि उच्चभ्रूंची वस्ती समजल्या जाणाऱ्या लोखंडवाला, वर्सोवा, चार बंगला, ओशिवरा, डीएन नगर परिसरात 10ची डेडलाइन उलटल्यानंतरही फटाक्यांचा दणदणात सुरू होता. मोठ्या आवाजाचे कानठळ्या बसवणारे फटाके रात्री 11 नंतरही सर्रासपणे फोडले जात होते.
मंगळवारी नरक चतुर्दशीदिवशी फटाक्यांचा आवाज काहीसा कमी होता. मात्र आज लक्ष्मीपूजनानंतर मुंबईत फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर आतषबाजी झाली. रात्री 8 ते 10 या फटाके फोडण्यासाठी निर्धारित केलेल्या वेळेनंतरही मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. लोखंडवाला, वर्सोवा, चारबंगला, ओशिवरा, डीएल नगर या परिसरात तर मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा कहर सुरू होता. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांच्या दणदणाटामुळे अनेकांना दारे खिडक्या बंद करून घरात राहावे लागल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
मात्र फटाक्यांचा एवढा आवाज सुरू असूनही पोलिसांनी या दणदणाटाडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत होते.
मिरा-भाईंदर, ठाणे येथेही दणदणाट
मुंबईप्रमाणेच ठाणे आणि मिरा-भाईंदर परिसरातही फटाक्यांचा दणदणाट सुरू होता. रात्रीचा पाऊण वाजून गेला तरी मीरा भाईंदरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला झुगारून मोठ्या प्रमाणात फटाके फोडणे सुरूच होते. पोलिसां कडे तक्रारी करून देखील काहीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादित वेळेनंतर फटाके फोडल्याने मंगळवारी मध्यरात्री म्हणून ट्रॉम्बे पोलिसांनी दोन अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल केला असून फटाके वाजविणाऱ्यांचा शोध घेत आहेत. मानखुर्दच्या काही भागात रात्री उशिरापर्यंत फटाके वाजण्यात आले. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने रात्री आठ ते दहा या मर्यादित वेळेतच फटाके फोडावेत, यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासानाने नजर ठेवावी, असे निर्देश नुकतेच दिले होते. कोर्टाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करता यावी म्हणून राज्यभर पोलिसांची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. मंगळवारी ट्रॉम्बे येथे अभ्यंगस्नानाच्या दिवशी दोन तरुणांनी सोसायटीच्या आवारात फटाके फोडले. मध्यरात्री हे फटाके फोडण्यात आल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मुंबईत हा पहिलाच गुन्हा दाखल झाला असून अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिवाळी सणात रात्री ८ ते १० दरम्यान फटाके फोडण्यास मुभा दिली आहे. त्याशिवाय ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरदिवशीही रात्री ११.४५ ते १२.१५च्या दरम्यानच फटाके फोडण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच न्यायालयाने ई-कॉमर्स पोर्टल्सला म्हणजेच ऑनलाईन फटाके विकण्यास बंधन आणले आहे. गुन्हा दाखल झाल्याप्रकरणाचे चित्रीकरण देखील वायरल झाले आहे.