अवकाळी पावसामुळे द्राक्ष, संत्र्यांचं मोठं नुकसान, फक्त घोषणा नको, मदत हवी; विजय वड्डेटीवारांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 04:57 PM2023-11-28T16:57:16+5:302023-11-28T16:58:52+5:30
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.राज्यात अनेक ठिकाणी पंचनामे होऊनही आर्थिक मदत पोहोचली नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आज विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे.
सहन होत नाही, सांगताही येत नाही अशी ठाकरेंची अवस्था; शंभूराज देसाईंचा पलटवार
"राज्यात या दोन दिवसात अवकाळी पावसामुळे ७८ हजार ६७६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. द्राक्ष, संत्रा या फळांचे मोठे नुकसान झाले आहे. धन उत्पादन शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय, पण सरकार मात्र तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत, असा टोला वड्डेटीवार यांनी लगावला. तेलंगणा येथून ते मदत करणार असं सांगत आहेत. मी मागच्या वेळेही लक्षात आणून दिले आहे, चाळीस तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले तर एनडीआरएफची मदत मिळेल पण एक हजार तालुके जाहीर केल्यावर त्यासाठी मदतीसाठी हात वर केले आहेत. एनडीआरएफच्या गाईडलाईन्समध्ये हे बसत नाहीत. त्यामुळे आता ही तालुके मदतीसाठी वंचित राहणार आहेत, आता तातडीने पंचनामे करण्याची गरज असताना आता सरकार मदत कधी करणार हा खरा प्रश्न आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते वड्डेटीवार यांनी केला.
"शेतकऱ्यांचा वाली कोण, त्यांच्या प्रश्नाकडे कोण बघेल. सरकार खोट आश्वासन शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. मागच्या वर्षीचे अजुनही पैसे मिळालेले नाहीत. पीकविम्याबाबतही सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते, त्याचेही पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. सरकारने तिजोरीकडे बोट दाखवून हात वर करु नयेत, असंही विजय वड्डेटीवार म्हणाले.