मुंबईतील अतिप्रदूषणाच्या दिवसांमध्ये वाढ होणार; २२ दिवस अत्यंत वाईट स्थिती
By सचिन लुंगसे | Published: December 12, 2022 12:46 PM2022-12-12T12:46:43+5:302022-12-12T12:47:07+5:30
ला निनाच्या घटनेमुळे भारतात अस्वाभाविक गारठा आणि विस्तारीत हिवाळा अनुभवायला येत असून, यापुढेही अनुभवत राहील.
मुंबई : येत्या काही वर्षांत हिवाळ्याच्या महिन्यात मुंबईच्या हवेची गुणवत्ता ‘वाईट’ आणि ‘अतिवाईट स्तरावर’ असण्याच्या दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये हवेच्या गुणवत्तेची स्थिती जशी होती तसाच अनुभव येत्या काही वर्षांमध्येदेखील जाणवू शकतो. तर दुसरीकडे सध्याच्या मंदौस चक्रीवादळानंतरचा प्रभाव आणि मुंबईतील वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असून मुंबईच्या हवा प्रदूषणात घट होण्याची शक्यता आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी (आयआयटीएम) अंतर्गंत असलेल्या सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी एण्ड वेदर फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्चचे (सफर) संस्थापक प्रकल्प संचालक (निवृत्त) डॉ. गुफ्रान बेग यांनी वातावरणीय घटकांमुळे मुंबईतील वाऱ्याचा वेग मंदावल्याचे वैज्ञानिक विश्लेषण केले आहे. गेल्या दोन महिन्यात हवामानाच्या परिस्थितीत मोठे बदल दिसून आले आहेत. ला निनाच्या घटनेमुळे भारतात अस्वाभाविक गारठा आणि विस्तारीत हिवाळा अनुभवायला येत असून, यापुढेही अनुभवत राहील.
भूमध्य समुद्राच्या तापमानवाढीचा प्रभाव देशाच्या पश्चिम भूभागावर आहे. परिणामी मुंबई प्रदेश आणि सभोवतालाच्या पश्चिम भारताच्या भागात अस्वाभाविक शांत वारे वाहत आहेत. मुंबई समुद्राने वेढली असूनदेखील, या शांत वाऱ्यांमुळे प्रदूषक घटक सहजपणे विखरुन गेले नाहीत हे दिसून येते, बेग म्हणाले. अशा प्रकारच्या घटना दिसत असून, त्यांचा संबंध वातावरण बदलाच्या परिणामांशी असू शकतो. येत्या काही वर्षांमध्ये मुंबईत उच्च हवा प्रदूषणाच्या घटना वाढण्याची शक्यता आहे, असे डॉ. बेग यांनी नमूद केले.
उद्योगधंदे किंवा रिफायनरी हे हवा प्रदूषणाचे मुख्य स्रोत असते तर केवळ सूक्ष्म पार्टिक्यूलेट मॅटर (फाईन पार्टिक्यूलेट मॅटर) किंवा पीएम 2.5 चे प्रमाण उच्च दिसले असते. म्हणजेच बांधकामातून उडणाऱ्या धूळीमुळे पीएम 2.5 आणि पीएम 10 दोन्हीच्या प्रमाणात वाढ होण्यास चालना मिळून मुंबईच्या हवेची गुणवत्ता बिघडली.
या वर्षी 1 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या दरम्यानच्या काळात 40 दिवसांपैकी 22 दिवस मुंबईच्या (पूर्ण शहर) हवेची गुणवत्ता वाईट आणि अतिवाईट स्तरावर होती. त्यापैकी चार दिवस (5, 6, 7 आणि 8 डिसेंबर) हे अतिवाईट स्तरावर होते. तर 2021 मध्ये (याच काळात 1 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर) केवळ सहा दिवस हवेची गुणवत्ता वाईट स्तरावर होती आणि हवेची गुणवत्ता अति वाईट असणारा एकही दिवस नव्हता. 2021 मध्ये 1 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या काळात, 18 दिवस पार्टिक्यूलेट मॅटरचे (पीएम 2.5) प्रमाण विहित मर्यादेच्या आत होते. मात्र 1 नोव्हेंबर आणि 10 डिसेंबर 2022 दरम्यान केवळ एकच दिवस पीएम 2.5 चे प्रमाण विहित मर्यादेच्या आत होते.
मुंबईच्या हवा प्रदूषणाचे स्रोत
वाहतूक क्षेत्र ३० टक्के
उद्योगधंदे १८ टक्के
जैवइंधन किंवा निवासी क्षेत्रातून होणारे उत्सर्जन २० टक्के
हवेतून पसरणारी धूळ १५ टक्के
हवामान संदर्भातील घटक (समुद्री मीठासह) उर्वरित क्षेत्र