लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सकाळी दाटून आलेल्या ढगांनी मुंबईकरांना चकवा दिला. कुठे तरी पडलेली तुरळक सर वगळता तापदायक दुपारच्या उकाड्याने मुंबईकरांचा घाम काढला. सायंकाळही काहीशी अशीच असतानाच सूर्यास्तानंतर मात्र मुंबईच्या क्षितिजावर पावसाचे काळे ढग जमा झाले. हो हो म्हणता मुंबईवर ढगांचा गडगडाट होऊ लागला आणि रात्रीच्या काळोखात दाटून आलेल्या जलधारांनी मुंबईला अक्षरश: कवेत घेतले.
मंगळवारी रात्री ७ वाजल्यापासून मुंबईत सुरू झालेल्या जलधारांचा वर्षाव रात्रीचे नऊ वाजले तरी कोसळतच होता. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सोबतीला सुरू असतानाच नऊच्या सुमारास मात्र पावसाचा जोर किंचित कमी झाला. मात्र, सकाळ आणि दुपार अशा दोन्ही प्रहरी चकवा दिलेल्या मान्सून सरींनी रात्री दाखल होत मुंबईकरांना गारवा दिला. पुढील चार एक दिवस मुंबईसह राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व सरींचा असाच वर्षाव होत राहील, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.
...................................