मुंबई - मुंबई, ठाणे आणि कोकणात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस दक्षिण कोकण, गोवा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचंही हवामान विभागानं म्हटले आहे. दरम्यान, रविवारी (17 जून) कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला.
रायगड जिल्ह्यात धो-धो; शेतकरी सुखावलारायगड जिल्ह्यात रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात ३३४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर परिसरात वादळी पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. घरे, दुकाने तसेच शासकीय गोदामांचे पत्रे, कौले उडाल्याने लाखोंची हानी झाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले. तहसील कार्यालयाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली असून पंचनामे करण्यात आले आहेत. वादळी वा-यामुळे झाड कोसळल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
केळवे बीचवर चार तरुण बुडालेकेळवे बीचवर रविवारी सकाळी ११ वाजता नालासोपाऱ्याचे ४ तरुण बुडाले, तिघांना वाचविण्यात यश आले. एकाचा मृतदेह सापडला असून इतरांचा शोध सुरू आहे. ७ तरुणांचा गट केळवे-दादरा पाडा येथे धोकादायक खाडीवर गेला होता. फलकाकडे दुर्लक्ष करत त्यातील काही जण समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. दीपक परशुराम चालवादी (१७) याचा मृतदेह सापडला असून दीपेश पेडणेकर, श्रीतेज चिपटे आणि तुषार चिपटे हे बेपत्ता झाले आहेत. गौरव सावंत, संकेत जोगळे, देविदास जाधव यांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले
ठाणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊसआठ दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून हजेरी लावली असून मागील २४ तासांत २०५ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला असून ठाणे शहरात सकाळी ८ वाजतादरम्यान वेगवेगळ्या दोन ठिकाणी सहा गाड्यांवर झाडे उन्मळून पडल्यामुळे नुकसान झाले.