मुंबई- राज्यभरात आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, वाशीम, गडचिरोली यासह अन्य ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग, मध्य आणि हार्बर लोकल सेवेला मोठा फटका
या वर्षी उशीरा पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. जून महिना पूर्ण कोरडा गेला. आता जुलैमध्ये काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. आजपासून पूर्ण राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलैसाठी पालघर, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
२० जुलै रोजी मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. २१ जुलै रोजी पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट दिला आहे.
रायगड जिल्ह्यात मुसळधार
रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर झाल्याने रात्रीपासून अती मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील नद्यानीही धोका पातळी ओलांडली असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने नागरिकांच्या मदतीसाठी बचाव पथक, आपदा मित्र, प्रशासन सज्ज झाले आहे.
पनवेल मध्ये पावसाचा जोर वाढला
पनवेल मध्ये पावसाचा जोर वाढला असुन तालुक्यातील गाढी,कासाडी नद्या दुथडी वाहत आहेत.दोन दिवसात 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद पनवेल तालुक्यात करण्यात आली आहे.सखल भागात पाणी साचल्याने नोकरकदार वर्गाला कामावर जाण्यास अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस
महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळी महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यावर बगीचा कॉर्नर नजीक पाणी आल्याने वाहतूक काहीकाळ मंदावली होती. २४ तासात २७५.६ मि मी पावसाची नोंद जवळ पास ११इंच पाऊसाची नोंद करण्यात आली महाबळेश्वर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महाबळेश्वर-पांचगणीकरांची तहान भागविणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला.
चिपळुणात पुरसदृश्य स्थिती
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी येथे पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी व शिवनदी दुथडी भरून वाहत आहे. सह्याद्री खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोलकेवाडी आणि पोफळी २२० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तसेच चिपळूण परिसरात 143.88 मिलिमीटर, तर आतापर्यंत 1300.99 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.
सावित्री आणि पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली
रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. रात्रीपासूनच जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. जिल्ह्यातील सावित्री आणि पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर कुंडलिका, अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.