Join us  

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचे धुमशान; शेतकऱ्यांना दिलासा, नागरिकांची भंबेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 11:38 AM

दुपारी घामाच्या धारांनी त्रस्त झालेला मुंबईकरांची पावसाने त्रेधातिरपीट उडविली.

मुंबई: दाटून येणाऱ्या ढगांनी बुधवारी सायंकाळी मुंबईला झोडपले. जिथे नजर जाईल तिथे फक्त काळोखच दिसत होता. चोरपावलांनी दाखल झालेल्या वाऱ्यानेही वेग घेतला आणि सूर्य मावळतीला जात असतानाच मुंबईत सरीवर सरी कोसळल्या.

दुपारी घामाच्या धारांनी त्रस्त झालेला मुंबईकरांची पावसाने त्रेधातिरपीट उडविली. पावसामुळे हवेत गारवा आला होता. दक्षिण मुंबईपासून दक्षिण मध्य मुंबई आणि पूर्व पश्चिम उपनगरात रात्रीपर्यंत पावसाने धुमशान घातले. रस्ते वाहतूक काहीशी मंदावली होती.

अर्ध्या तासात ठाणे चिंब-

गेले दोन दिवस ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरामध्ये सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हीटचे चटके जाणवत असताना बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ठाणे, कल्याण, डोंबिवली वगैरे शहरात आकाशात काळे ढग दाटून आले व जोरदार सरी बरसल्या, जेमतेम अर्धा- पाऊण तास झालेल्या मुसळधार पावसाने सखल भागांत पाणी साचले. अनेकांकडे छत्र्या, रेनकोट नसल्याने त्यांची त्रेधातिरपीट उडाली. विद्यार्थी, चाकरमानी व सार्वजनिक गणेश दर्शनाकरिता सहकुटुंब निघालेल्यांना या पावसाचा फटका बसला,

शेतकऱ्यांना दिलासा-

रायगड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पाऊस नसल्याने भातपीकही धोक्यात आले होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याचा जिल्ह्याच्या अनेक भागात बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन, तळा, पेण, अलिबाग या तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

नवी मुंबईकरांची भंबेरी-

नवी मुंबई पनवेल, नवी मुंबई परिसरात बुधवारी सायंकाळी चारनंतर अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकाची विशेषतः दर्शनासाठी रांगा लावलेल्या गणेशभक्तांची तारांबळ उडाली. अनेकांनी दर्शन अंदाज खरा ठरवत रायगड रांगेतून बाहेर पडून आडोशाला जाणे पसंत केले. उरण-पनवेल परिसरामध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला होता. मुसळधार पावसामुळे वृक्ष कोसळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :पाऊसमुंबईनवी मुंबईठाणे