मुंबईत पावसाची तुफान फटकेबाजी; उद्या सकाळपर्यंत 'रेड अलर्ट' कायम, IMDची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 01:03 PM2023-07-27T13:03:14+5:302023-07-27T13:04:00+5:30
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून पुढील दोन दिवस पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे.
मुंबई: मुंबईत रात्रभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सकाळी सहा वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून पुढील दोन दिवस पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज मुंबईत 'रेड अलर्ट' जारी केला होता. मात्र सध्याच्या पावसाचा अंदाज पाहता उद्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत रेड अलर्ट राहणार असल्याचं हवामान विभागाने आता जाहीर केले आहे.
मुंबईसह उपनगरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. दादर, अंधेरी, वसई, भांडूप, कुर्ला, पवई, घाटकोपर, कल्याण या परिसराते देखील पावसाची तुफान फटकेबाजी सुरु आहे. मागील २४ तासांत कुलाब्यात २२३.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सांताक्रुज वेधशाळेत मागील २४ तासात १४५.१ मिमी पाऊसाची नोंद झाली आहे.
पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
Mumbai recieved heavy to very heavy rain with isolated extremely heavy Rain (mm) during past 24 hrs
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 27, 2023
Santacruz 145.1
Colaba 223.2 (Extremely heavy rain)
Bandra 106.0
Dahisar 70.5
Ram mandir 161.0
Chembur 86.5
Byculla 119.0
CSMT 153.5
Matunga 78.5
Sion 112.0 pic.twitter.com/tQX8IKPhRQ
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूरसदृश्य परिस्थिती आहे. अंबरनाथ-बदलापूर जवळील बारवी धरण देखील जवळपास धोक्याच्या पातळीपर्यंत भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर धरणाचे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडणार आहेत आणि बारवी नदीत पाण्याचा विसर्ग होणार आहे.
७ तलावांपैकी ३ तलाव पूर्ण क्षमतेने भरले-
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळेच सात तलावांपैकी एक तुळशी तलाव २० जुलै रोजी रात्री १.२५ वाजता वाहू लागला तर विहार तलाव बुधवारी मध्यरात्री १२.४८ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. पालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी ३ तलाव आता पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली असल्याने मुंबईत अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात लागू असल्याने मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.