Mumbai Rain Update ( Marathi News ) : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने आज राजधानी मुंबईलाही झोडपून काढलं. सायंकाळी मुंबई शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसला. कार्यालयांतून घरी निघण्याच्या तयारीत असतानाच जोरदार पाऊस झाल्याने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ झाल्याचं पाहायला मिळालं.
हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार आज सायंकाळी मुंबई शहरासह उपनगरे आणि नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. गोरेगाव, मालाड, कांदिवली, अंधेरी,जोगेश्वरी, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या परिसरात संततधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. परिणामी कामावरून घरी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी झालेल्या या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला असून रात्री उशिराही पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.