मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह उपनगरांत संततधार सुरु असतानाच मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मुंबईत मध्यरात्रीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने सायन, दादर आणि हिंदमाता सारख्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यातच हवामान विभागाने येत्या काही तासांत मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सात दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करताना नागरिकांनी सर्तक राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पुन्हा पावसाचा जोर वाढला असून कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होऊन ती 37 फुटांवर पोहोचली आहे. महापुराची 39 फुटांची इशारा पातळी गाठण्यास अवघे दोन फूट शिल्लक राहिल्याने धास्तीने नागरिकांनी स्थलांतरास सुरुवात केली आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती कायम असून एक गणेश भक्त वाहून गेल्याची घटना घडली.
कोल्हापूर जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेल्याने 20 मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या तीन तुकड्यांना नदीकाठच्या गावांजवळ तैनात करण्यात आले आहे. नदीकाठच्या 129 आणि पूरबाधित 363 गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. कोयना धरणातून 41 हजार 888 क्युसेक विसर्ग केला जात आहे.