मुंबईकरांनो, पावसाच्या ४ महिन्यांत 'हे' १८ दिवस धोक्याचे; काळजी घ्या, सुरक्षित राहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 07:54 AM2021-06-11T07:54:54+5:302021-06-11T07:57:21+5:30
पावसाळ्याच्या ४ महिन्यांत १८ दिवस काळजीचे अन् जोखमीचे; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
मुंबई: पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली. मुंबई महापालिकेनं केलेले नालेसफाईचे दावे पहिल्याच पावसानं फोल ठरवले. अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. यानंतर आता हवामान विभागानं पुढील धोक्याची सूचना दिली आहे. पावसाळ्याच्या ४ महिन्यांत १८ दिवस धोक्याचे असतील, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या १८ दिवसांत अरबी समुद्राला भरती येईल. त्यामुळे ५ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. याच कालावधीत मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागेल.
सर्वसामान्यपणे १० जूनला मुंबईत पावसाचं आगमन होतं. मात्र यंदा एक दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झाला. बुधवारी सकाळी पावसानं दमदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबईचा वेग मंदावला. गुरुवारीदेखील मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये पाऊस सुरू होता. बऱ्याच भागांमध्ये पावसाची संततधार सुरू होती. मुसळधार पाऊस आणि त्याचवेळी समुद्राला भरती आल्यास मुंबईकरांसमोर दुहेरी संकट निर्माण होतं. त्यामुळेच हवामान विभागानं भरतीबद्दल महत्त्वाची सूचना दिली आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं निर्बंध हळूहळू शिथिल होऊ लागले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात समुद्राच्या लाटा अंगावर घेण्यासाठी अनेक जण बाहेर पडतात. अशावेळी भरती आल्यास दुर्घटनांचा धोका अधिक असतो. त्यामुळेच हवामान विभागानं पावसाळ्याच्या ४ महिन्यांतील भरतींची माहिती दिली आहे. चार महिन्यांमध्ये १८ दिवस जोखमीचे आहेत. यातील ६ दिवस जूनमधील आहेत. तर जुलैमधील १२ दिवस, ऑगस्टमध्ये ५ दिवस आणि सप्टेंबरमध्ये २ दिवस समुद्राला भरती येणार आहे.
तारीख - वेळ - लाटांची उंची (मीटरमध्ये)
23 जून- 10.53 - 4.56
24 जून- 11.45 -4.77
25 जून- 12.33 - 4.85
26 जून- 13.23 - 4.85
27 जून- 14.10 - 4.76
28 जून- 14.57 - 4.61
23 जुलै - 11.37- 4.59
24 जुलै- 12.24 -4.71
25 जुलै- 13.07 4.73
26 जुलै- 13.48 - 4.68
27 जुलै- 14.27 - 4.55
10 ऑगस्ट- 13.22 - 4.50
11 ऑगस्ट- 13.56 - 4.51
22 ऑगस्ट- 12.07- 4.57
23 ऑगस्ट- 12.43- 4.61
24 ऑगस्ट- 13.17 - 4.56
8 सप्टेंबर- 12.48 - 4.56
9 सप्टेंबर- 13.21 - 4.54