पावसाचे मृत्यूतांडव! ३१ बळी, शनिवारची मध्यरात्र ठरली काळरात्र; मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 04:57 AM2021-07-19T04:57:34+5:302021-07-19T04:58:18+5:30
मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले असून शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले असून शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली. रौद्र रूप धारण केलेल्या पावसात शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत संरक्षक भिंत कोसळून, दरड पडून तसेच घरांची पडझड अशा पाच दुर्घटनांमध्ये २८ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला, तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
दुर्घटनास्थळांवर अंगावर शहारे आणणारे दृश्य होते. लहान मुले, महिला, वृद्ध ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. मदत करणाऱ्यांचेही काळीज पिळवटून निघत होते. मध्यरात्री गाढ झोपेत मुंबईकरांवर काळाने झडप घातली.
शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता चेंबूर येथील न्यू भारत नगर येथे संरक्षक भिंतीचा भाग घरांवर कोसळला. त्यामुळे चार ते पाच घरे कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी १६ रहिवाशांचा मृत्यू झाला. ५ जण जखमी झाले आहेत. १४ मृतांची ओळख पटली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य केले. दुसऱ्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडूनदेखील येथे आवश्यक मदत रवाना करण्यात आली. सहा फायर इंजिन, एक रेस्क्यू व्हॅन यांच्यासह २० कामगार रविवारी दिवसभर येथे मदतकार्य करत होते. हे ठिकाण मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित आहे.
विक्रोळी येथे शनिवारी मध्यरात्री २.४० वाजता सूर्यानगरमधील पंचशील चाळीतील सहा घरांवर दरडीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले. येथील जखमींना राजावाडी आणि महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजावाडी येथे दाखल चार आणि महात्मा फुले रुग्णालयात दाखल एका जखमीचा मृत्यू झाला असून, महात्मा फुले रुग्णालयात दाखल जखमीस राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या जखमीची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त ठिकाणे वनविभागाच्या अखत्यारित आहेत. येथील दुर्घटनेची माहिती मिळताच मदतकार्य दिवसभर सुरू होते.
रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास चांदिवली येथे संघर्ष नगरमध्ये दरडीचा काही भाग इमारत क्रमांक १९ वर पडला. यात दोन लोक जखमी झाले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. रविवारी पहाटे पाच वाजता भांडुप पश्चिम येथील कोंबडीगल्ली येथील अमरकुल विद्यालयाजवळ असलेल्या चाळीतील घराचा भाग कोसळून सोहम महादेव थोरात (१६) हा मुलगा जखमी झाला. मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास अंधेरी येथील फिरदौस मिठाईवाला यांच्या दुकानात इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे जखमी झालेले सलीम पटेल (२६) यांना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पहाटे सव्वाचार वाजता त्यांचा मृत्यू झाला.
हवामानात झालेल्या उल्लेखनीय बदलामुळे मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा धिंगाणा सुरू असून, येत्या ४८ तासांत मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय येत्या चार ते पाच दिवसांसाठी मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट तर त्या पुढील दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली.
महाराष्ट्र किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. उत्तर अरबी समुद्र ते दक्षिण आंध्र किनारपट्टीपर्यंत पूर्व पश्चिम द्रोणीय क्षेत्र विरून गेले आहे. हवामानातील याच बदलामुळे पावसाचा मारा सुरू असून, १९ जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, अशी शक्यता आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. मृतांच्या नातेवाईकांना शासनातर्फे पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर झाली आहे.
जलशुद्धीकरण यंत्रणा पूर्वपदावर; पाणीपुरवठा सुरू
भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील नवीन आणि जुन्या अशा दोन्ही उदंचन केंद्रातील यंत्रणा टप्प्या-टप्प्याने कार्यान्वित होत असून मुंबईतील ज्या भागांना सायंकाळचा पाणीपुरवठा दिला जातो, त्या भागांना शनिवारी पाणीपुरवठा करण्यात आला. चॅपल रोड परिसर, खारदांडा, मोगरापाडा, पार्ले पूर्व परिसर, यारी रोड, मढ, गांधीनगर, बिंबीसार परिसर, ठाकूर संकूल, लोखंडवाला संकूल, दहिसर परिसर यासोबत तुळशीपाईप मार्ग, सेनापती बापट मार्ग परिसर, एन. एम. जोशी मार्गावर दादर ते भायखळा दरम्यान, तसेच दादर, माहिम, धारावी, भुुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, महालक्ष्मी, कुलाबा, कफ परेड येथे पाणीपुरवठा करण्यात आला. संकुल परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने विद्युत पुरवठा यंत्रणा बंद करावी लागली होती.
मुंबई पाऊस आकडेवारी
- कुलाबा १९६.८ मिमी
- सांताक्रूझ २३४.९ मिमी
- शहर १७६.९६ मिमी
- पूर्व उपनगर २०४.०७ मिमी
- पश्चिम उपनगर १९५.४८ मिमी
- सरासरी पाऊस ५५.२९ टक्के