पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 05:40 AM2018-06-10T05:40:31+5:302018-06-10T06:12:21+5:30
मुंबईसह आसपासच्या परिसरात शनिवारी दाखल झालेल्या मान्सूनने पहिल्याच दिवशी परिसराला झोडपून काढले. विशेषत: शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत तडाखा कायम ठेवला.
मुंबई -
मुंबईसह आसपासच्या परिसरात शनिवारी झालेल्या मान्सूनच्या पावसाने पहिल्याच दिवशी झोडपून काढले. शनिवारी पहाटे सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दुपारपर्यंत तडाखा कायम ठेवला. परिणामी, शहर व उपनगरांच्या सखल भागांत पाणी साचले. या पावसाने ठाणे जिल्ह्यात तीन जणांचा तर मुंबईत दोघांचा बळी घेतला.
मान्सून मुंबईत दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल मध्य अरबी समुद्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड व ओरिसासह उत्तर-पश्चिम बंगालच्या महासागरात झाल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटक किनारा, गोवा व महाराष्ट्रात मान्सूनचा तडाखा सुरूच असून, १२ जूनपर्यंत पावसाचा वेग कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर येथे १० ते १३ जूनदरम्यान पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. कोकणात पावसाचा मारा कायम राहील. ताशी ६० किलोमीटर या वेगाने वारे वाहतील.
बहुतांश मराठवाडा मान्सूनने व्यापला आहे. परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा कोल्हापूर जिल्ह्यातही सरी कोसळल्या. नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला.
मुंबईसह आसपासच्या परिसरात शनिवारी दाखल झालेल्या मान्सूनने पहिल्याच दिवशी परिसराला झोडपून काढले. विशेषत: शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत तडाखा कायम ठेवला. परिणामी, मुंबई शहरासह उपनगरातील सखल भागांत पाणी साचल्याने मान्सूनच्या पहिल्याच दिवशी मुंबई पाण्याखाली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग, एस.व्ही. रोड आणि कुर्ला-अंधेरी रोड अशा ठिकठिकाणी सखल भागांत साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली. दुसरीकडे हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूकही धिम्या गतीने सुरू होती.
शनिवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास मुंबईत ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट सुरू झाला. पहाटे दीड वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाचा धिंगाणा पहाटे ३ वाजेपर्यंत सुरूच होता. सकाळी आणखी वेगाने सुरू झालेल्या पावसाने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. मुंबईसह उपनगरातील सखल भागांत पावसाचे पाणी साचण्यास सुरुवात झाली. मुंबई शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर भायखळा, चिंचपोकळी, परळ, हिंदमाता, सायन इत्यादी ठिकाणी सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली. विशेषत: हिंदमाता परिसरात साचलेल्या पाण्याने येथील मार्ग ठप्प झाला. लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, शीतल सिनेमा, कमानी जंक्शन आणि घाटकोपर येथील सखल भागांत पावसाचे पाणी साचले. परिणामी, येथील रस्ते वाहतूक मंदावली. कुर्ला-अंधेरी रोडवर मरोळ येथे सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. पश्चिम उपनगरातही सखल भागांत साचलेल्या पाण्याने एस.व्ही. रोडसह वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी येथे वाहतुकीचा वेग संथ झाला होता.
सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल फेऱ्या १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. मध्य रेल्वेमार्गावर सायन येथे रुळावर साचलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेचा वेग धिमा झाला. पश्चिम मार्गावरील रुळांवर पाणी साचले नाही. मात्र, लोकलचा वेग मंदावला होता.
डबेवाल्याची सेवा अखंड सुरू
मुसळधार पाऊस कोसळत असतानादेखील मुंबईच्या डबेवाल्यांनी आपल्या सेवेमध्ये खंड पडू दिला नाही. पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचलेले असतानाही डबेवाले पाण्यातून वाट काढत डब्यांची सेवा मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते. कोणत्याही परिस्थितीत मुंबईकर नागरिक उपाशी राहू नये या उद्देशाने डबेवाले रोहिदास सावंत यांच्यासह अन्य डबेवाल्यांनीही शनिवारी आपल्या सेवेत खंड पडू दिला नाही. त्यामुळे ऊन, वारा, जोरदार पाऊस जरी असला तरी मुंबईचा डबेवाला वेळेत डबे पोहोचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा पाहायला मिळाले.
बेस्ट, विमान सेवेलाही फटका
पावसामुळे विमान तसेच बेस्ट सेवेलाही काहीसा फटका बसला. कोणत्याही विमानांचे मार्ग वळविण्यात आले नाहीत किंवा कोणतीही विमाने रद्द केली नाहीत. मात्र विमानांची सेवा १५ ते २० मिनिटे विलंबाने सुरू होती, असे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडने स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिवसभरात आगमनांपैकी ९२ विमानांना विलंब झाला.
भायखळा पोलीस ठाण्यात पाणीच पाणी
मान्सूनने शनिवारी दक्षिण मुंबईत जोरदार सलामी दिल्याने सर्वत्र पाणी तुंबले. सखल भागात असलेल्या भायखळा पोलीस ठाण्याच्या आवारातही पाणी साचले होते. त्यामुळे ठाण्याला छोट्या तळ्याचे स्वरूप आल्याने कामकाज थंडावले. पोलीस ठाण्यातील कागदपत्रे, दस्तावेज खराब होऊ नयेत म्हणून पोलीस ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात मग्न होते.
झाड कोसळून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
दहिसर पूर्व येथील एस.एन. दुबे रोडवर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत दृष्टी मुकेश मुंग्रा (१३) हिचा मृत्यू झाला. झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या दृष्टीला येथील रोहित नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
महापालिका काय म्हणते...
हिंदमाता परिसर, धारावी, परळ टी. टी. येथे १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला.
गेल्या वर्षीच्या पावसानंतर शहरात १२० ठिकाणी रस्त्याची मुख्य कामे हाती घेण्यात आली; त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे.
अंधेरी-कुर्ला रोड, स्वागत हॉटेल - सांताक्रुझ, जयभारत कॉलनी, ओबेरॉय मॉल, लोखंडवाला सर्कल, श्रीकृष्ण हॉल, आनंदनगर येथे शनिवारी पाणी साचले नाही.
मुंबई शहरामध्ये हिंदमाता, परळ टी. टी. व सायन रोड नंबर २४, किंग्जसर्कल या ठिकाणी १ फुटापेक्षा कमी पाणी तुंबले; इतर कोणत्याही भागात पाणी तुंबले नाही.
गेल्या वर्षी साधारणत: इतक्या पावसात ज्या ठिकाणी पाणी तुंबले होते त्या फीतवाला रोड, वाकोला पोलीस ठाणे, कुर्ला येथे पाणी तुंबले नाही.
कोणताही सबवे पाण्याखाली गेलेला नाही. सबवे वाहतूक सुरू आहे. नद्यांची पातळी नियमित प्रमाणात आहे.
२९८पैकी आवश्यकतेनुसार ६४ ठिकाणी पंप सुरू करण्यात आले. तर पर्जन्यजल वाहिन्या विभागाच्या उदंचन केंद्रातील पंप आवश्यकतेनुसार सुरू होते.
महानगरपालिका अधिकारी, पर्जन्यजल वाहिन्या/मलनि:सारण विभागाचे कर्मचारी, कामगार अशा प्रकारे ३ हजारपेक्षा जास्त कर्मचारी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्यरत आहेत.
येथे साचले पाणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर भायखळा, चिंचपोकळी, परळ, हिंदमाता, सायन इत्यादी ठिकाणचे सखल भाग, हिंदमाता परिसर
शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, शीतल सिनेमा, कमानी जंक्शन आणि घाटकोपर येथील सखल भाग
कुर्ला-अंधेरी रोडवर मरोळ येथील सखल भाग
पश्चिम उपनगरातील एस. व्ही. रोडसह वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरीतील सखल भाग
मुंबई शहर आणि उपनगरात किंग्ज सर्कल, हिंदमाता, वांद्रे, सायन, एस.व्ही. रोड, परळ, प्रतीक्षा नगर येथील सखल भागांत पाणी साचले होते. त्यामुळे बेस्ट बसचे काही मार्ग बदलण्यात आले.
ठाण्यात तिघांचा मृत्यू, सात जखमी
ठाणे : पहिल्या पावसाने ठाणे जिल्ह्यात तीन जणांचा बळी गेला असून, सात जखमी झाले आहेत. पहिल्याच पावसाने ठाणे रेल्वे स्थानकात सकाळी रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.
शनिवारी सकाळी भार्इंदर येथे वीज कोसळून प्रातर्विधीसाठी गेलेल्या स्टॅनी इनास अदमनी या मच्छीमाराचा मृत्यू झाला, तर रोहन राजेश पोशापीर, गिल्डर खोपटकर, राजेश पिला, सनी पिला हे जखमी झाले. वीज कोसळल्याने येथील काही घरांमधील विजेची उपकरणे बंद पडली, तर वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. सकाळी पाऊस सुरू असताना खड्डा चुकवताना दुचाकीस्वार प्रियंका झेंडे या तरुणीचा ट्रकखाली आल्याने मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण तन्वी वसंत बोलाडे ही जखमी झाली. तिसºया घटनेत भिवंडीत रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात वीजप्रवाह उतरल्याने अली अकबर अली हैदर अन्सारी या रिक्षाचालकाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. मुंब्रा येथे बायपासची भिंत कोसळून एका घराचे मोठे नुकसान झाले. या पावसात एकूण सात जण जखमी झाले आहेत. संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात २४ तासांत ४०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रायगडमध्ये जोर‘धार’
अलिबाग : रायगड जिल्ह्यात शनिवारी सरासरी ५९.४२ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली. कोकण रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासात आपल्या ट्रेनचा वेग नियंत्रित केला आहे. परिणामी, कोकण रेल्वे विलंबाने धावत आहे. पनवेल तालुक्यातील विमानतळबाधित कोंबडभुजे गावात पहिल्याच पावसात पाणीच पाणी साचले.
बळीराजा सुखावला...
वसईत ८ ते १२ जूनपर्यंत जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला होता. परंतु, ८ जूनचा दिवस कोरडा गेल्याने हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरतो की काय असे वाटत होते. मात्र, शनिवारी पहाटेपासून पावसाने जोरदार सुरु वात केली. दुपारपर्यंत ८० मिमी पावसाची नोंदी झाली. त्यामुळे बळीराजाही सुखावला.