Mumbai Rain: गरजणारा बरसला; मुंबईभर पावसाचा राडा, संध्याकाळनंतर जाेर ओसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 08:01 AM2021-06-13T08:01:35+5:302021-06-13T08:01:52+5:30

तुफानी माऱ्याचा जाेरदार फटका, शहर, उपनगरात सकाळच्या सत्रात कडकडाटासह गडगडाट, संध्याकाळनंतर जाेर ओसरला

heavy rain in mumbai; low after evening | Mumbai Rain: गरजणारा बरसला; मुंबईभर पावसाचा राडा, संध्याकाळनंतर जाेर ओसरला

Mumbai Rain: गरजणारा बरसला; मुंबईभर पावसाचा राडा, संध्याकाळनंतर जाेर ओसरला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईकर शनिवारी साखरझोपेत असतानाच पुन्हा एकदा आकाशात अतिवृष्टीचे ढग दाटून आले. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. सोबत जोरदार वाऱ्यानेही हजेरी लावली. जणू काही निसर्ग मुंबईवर चाल करून आला आहे, असे वातावरण निर्माण झाले आणि काही क्षणातच पावसाने मुंबईला झाेडपून काढले.
मुंबई शहरापासून उपनगरापर्यंत पहाटे सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. सकाळी ९ ते १०च्या दरम्यान दादरपासून कुर्ला, सायन आणि घाटकोपर याठिकाणी मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली. या काळात मुंबईवर ढगांचा गडगडाट सुरुच होता. पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी मुंबईला कवेत घेतले होते. विशेषतः मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाची भल्या पहाटेपासून जोरदार बॅटिंग सुरू होती.

पूर्व आणि पश्चिम उपनगरात झालेल्या पावसाने शनिवारी पहाटे शंभरी ओलांडली होती. हाती आलेल्या माहितीनुसार, सकाळी अकरा वाजेपर्यंत सांताक्रुझ येथे १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय पश्चिम उपनगरातल्या गोरेगाव आणि बोरिवली या ठिकाणांसोबत कुर्ला येथेही पावसाने जवळजवळ शंभरी ओलांडली. शतक पूर्ण करतानाच पावसाने टपोऱ्या थेंबांच्या माध्यमातून चौकार आणि षटकार लगावले.

सकाळी दहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत कुर्ला आणि आसपासच्या परिसरात मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यावर जणूकाही ओढे वाहू लागले. पावसाचा तुफानी मारा सुरू असतानाच सकाळी पावणे अकराच्या सुमारास हवामान खात्याने पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला. पावसाने ताे खरा ठरवला. सकाळी पावणे अकरा वाजता पुन्हा एकदा तुफान मारा सुरू केला.

पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच मुंबईच्या रस्त्यांवरील वाहनांच्या गर्दीचा महापूर मात्र कायम होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला अंधेरी रोड, चेंबूर लिंक रोड, दोन्ही एक्स्प्रेस या प्रमुख मार्गांवर पावसाने दाणादाण उडवून दिली. काही सखोल भागात पाणी साचले. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.
सकाळी ११ वाजता यात आणखी भर पडली. मुंबईच्या रस्त्यांवरील गर्दी कमी होऊ लागली. याच काळात मुंबईचे नाले पावसाच्या पाण्याने भरून वाहू लागले. पुन्हा एकदा ढगांचा गडगडाट सुरू झाला. अशा काहीशा वातावरणाने मुंबईकरांना धडकी भरली. त्यानंतर दुपारी तसेच संध्याकाळी मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली.

रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका
मुंबई : जोरदार पावसामुळे शनिवारी मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला.अंधेरी वीरा देसाई रोड, मालाड सबवे, ॲण्टाॅप हिल, वांद्रे नॅशनल कॉलेज, हिंदमाता, कुर्ला कमानी, किंग सर्कल, वडाळा, सायन आदी भाग जलमय झाला होता.
सायन पुलाखाली प्रचंड पाणी साचले होते. सायनपासून ठाण्याकडे जाणारे रस्तेही पाण्याखाली गेले होते. सायन, दादर, कुर्ला, चुनाभट्टी, धारावी आणि चेंबूर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या ठिकाणी राहणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अंधेरी फाटक आणि सबवेमध्ये पावसाचे पाणी साचले हाेते. या भागात गुडघ्यापर्यंत पाणी आल्याने गाड्यांमध्येही पाणी शिरले. अंधेरी सबवेमध्ये पोलीस तैनात ठेवण्यात आले होते.

nभारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ जून सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १२ जूनच्या ८ वाजेपर्यंत कुलाबा येथे ९०, तर सांताक्रूझ येथे १०७ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. पहाटेपासून दुपारपर्यंत पाऊस कोसळत असतानाच ११ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. १५ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. 
nसातत्याने काेसळणाऱ्या पावसामुळे दादर येथील हिंदमाता, माटुंगा येथील गांधी मार्केट, वडाळा, कुर्ला येथील कमानी, वीरा देसाई रोड, साई नाथ सबवे, वांद्रे येथील नॅशनल कॉलेजलगतचे बेस्टचे मार्ग वळविण्यात आले होते.  
nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला अंधेरी रोड, चेंबूर लिंक रोड, दोन्ही एक्स्प्रेस या प्रमुख मार्गांवर पावसाने दाणादाण उडवून दिली. सखोल भागात पाणी साचले. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.
nसकाळी ११ वाजता यात आणखी भर पडली. याच काळात मुंबईचे नाले पावसाच्या पाण्याने भरून वाहू लागले. पुन्हा एकदा ढगांचा गडगडाट सुरू झाला. त्यामुळे मुंबईकरांना धडकी भरली. त्यानंतर दुपारी तसेच संध्याकाळी मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली.

Web Title: heavy rain in mumbai; low after evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.