मुंबईसह उपनगरात दमदार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 10:38 AM2018-06-17T10:38:46+5:302018-06-17T10:39:55+5:30
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. रविवारी पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाच्या मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.
मुंबई - काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. रविवारी पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाच्या मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. मुंबई आणि उपनगरांप्रमाणेच कोकणातही पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, रविवार आणि सोमवार मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईतील लोअर परळ, वरळी, दादर आदी भागात पावसाचा जोर होता. तसेच उपनगरातील अंधेरी, बोरिवली, मुलुंड, भांडूप येथेही पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. मुंबईप्रमाणेच ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, वसई आणि विरार या भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
दरम्यान पावसामुळे जोगेश्वरी परिसरात इमारतीची संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले आहे. मात्र या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेले नाहीत. तसेच ठाण्यातील तीन हात नाका परिसरात एक झाड कोसळून पाच वाहनांचे नुकसान झाले आहे.