Join us

पुढील ३ ते ४ दिवस मुसळधार पाऊस; भारतीय हवामान खात्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 7:13 AM

मुंबईत सोमवारी सांताक्रुझ वेधशाळेने ०.७ मिलिमीटर पावसाची नोंद केली आहे.

मुंबई : ऑगस्ट महिन्यात  मुसळधार पाऊस अपवादानेच बरसला; मात्र मंगळवारपासून मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोर धरण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असल्याने मुंबईतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत सोमवारी सांताक्रुझ वेधशाळेने ०.७ मिलिमीटर पावसाची नोंद केली आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर हे दोन दिवस मुंबईतील काही भागांमध्ये जोरदार ते  अति जोरदार सरी कोसळणार आहेत. तर ३१ ऑगस्ट रोजी ठाणे आणि रायगडमध्ये काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पालघरमध्ये मंगळवारी येलो अलर्ट तर १ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवस मान्सून पुन्हा सक्रिय होईल. या काळात ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :पाऊसमुंबई