रविवारीही मुसळधार? हवामान खात्याकडून रेड, ऑरेंज अलर्ट जारी
By सचिन लुंगसे | Published: August 3, 2024 05:28 PM2024-08-03T17:28:01+5:302024-08-03T17:29:09+5:30
Mumbai Rain Update: हवामान खात्याने पालघर, पुणे आणि सातारा जिल्हयांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई - मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व व पश्चिम उपनगरात शनिवारी सकाळी आणि दुपारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना अक्षरश: झोडपून काढले. सायंकाळी पावसाचा जोर ओसरतो तोच रविवारीही पावसाचा मारा कायम राहणार असून, हवामान खात्याने पालघर, पुणे आणि सातारा जिल्हयांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत अधून-मधून सोसायटच्या वा-यासोबत कोसळणा-या पावसाने शनिवारी पहाटेपासूनच आपला मारा सुरु केला होता. विशेषत: शहराच्या तुलनेत पूर्व व पश्चिम उपनगरात अधिक पाऊस कोसळत होता. शनिवारी सकाळी १० ते १२ दरम्यान अधून-मधून सोसाटयाच्या वा-यासह वेगाने येणारा पाऊस मुंबईकरांना धडकी भरवत होता. सकाळी दादर परिसरात पडलेल्या पावसाने नागरिकांना उद्योजकांना धडकी भरविली होती. वेगवान पावसाचा मारा कायम राहिला असता तर दादर आणि परिसरात पाणी साचण्याची शक्यता होती. मात्र पावसाने जोर ओसरल्याने पाण्याचा निचरा झाल्याचे दादरमधील व्यापा-यांनी सांगितले.
दुपारी बारा ते एक विश्रांती घेतलेल्या पावसाने नंतर बीकेसी, कुर्ला, सायन, घाटकोपर, विद्याविहार, साकीनाका, अंधेरी, बोरीवली, गोरेगाव आणि पवई परिसरात तुफान बरसात केली. यादरम्यान पडलेल्या पावसामुळे एलबीएस मार्गावरील शीतल सिनेमा सिग्नल, कुर्ला डेपो, काळे मार्ग, कुर्ला स्टेशन, सुंदरबाग लेन, काजुपाडा परिसरात पाणी साचले होते, अशी माहिती स्थानिक रहिवासी अनिल गलगली यांनी दिली. दुपारी तीन नंतर मात्र पावसाचा जोर ब-यापैकी ओसरल्याचे चित्र होते. दरम्यान, दुपारी दोन ते तीन दरम्यान पूर्व उपनगरात बीकेसी, कुर्ला, घाटकोपर व कांजुरमार्ग परिसरात ढगांनी काळोख केल्याने दुपारीच सायंकाळ झाल्याचे चित्र होते. शनिवारी दुपारी पडलेल्या पावसादरम्यान विद्यार्थ्यांसह पालकांची तारांबळ उडाली होती.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने राज्यातील काही ठिकाणांना चार दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि कोकणात सतर्कता बाळगण्यात यावी.
- कृष्णानंद होसाळीकर
प्रमुख, पुणे, भारतीय हवामान शास्त्र विभाग