Join us

वसईत पावसाची दमदार हजेरी

By admin | Published: July 02, 2014 11:43 PM

दीर्घ प्रतीक्षेनंतर आज पावसाने दमदार हजेरी लावली. उपप्रदेशाच्या शहरी व ग्रामीण भागात सकाळी १० वाजल्यापासून जोरदार सुरुवात झाली व अनेक भाग जलमय झाले.

वसई : दीर्घ प्रतीक्षेनंतर आज पावसाने दमदार हजेरी लावली. उपप्रदेशाच्या शहरी व ग्रामीण भागात सकाळी १० वाजल्यापासून जोरदार सुरुवात झाली व अनेक भाग जलमय झाले. या पावसाने महानगरपालिकेचे पितळ उघडे पाडले. नालेसफाई, गटार सफाई योग्य पद्धतीने करण्यात न आल्यामुळे पावसाळी पाणी साचून अनेक भाग जलमय झाले. मात्र या पावसामुळे ग्रामीण भागातील बळीराजा मात्र सुखावला.गेला महिनाभर पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागातील भातशेती धोक्यात आली होती. तर शहरी भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण होवून नागरिकांचे हाल झाले. वसई-विरार उपप्रदेशात साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होत असते. परंतु यंदा संपूर्ण जून महिना कोरडा गेला. नांगरणीची कामे पूर्ण झाल्यानंतर पेरणी सुरू होते. अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु पाऊस गायब झाल्यामुळे शेतात टाकलेले बी-बियाणे नष्ट झाले. त्यामुळे शेतकरीवर्ग धास्तावला होता. दोन दिवसांपासून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु पावसाने मात्र आपला लपंडाव चालूच ठेवला. आज सकाळी १० वाजता मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या दोन तासात झालेल्या पावसाने वसई-विरारकरांची दैना उडवली. छत्र्या व रेनकोट सोबत न घेणाऱ्या चाकरमान्यांचे अचानक आलेल्या पावसाने चांगली त्रेधातिरपीट उडवली. दुसरीकडे भागातील शेतकरी मात्र सुखावले. पाऊस पडावा म्हणून अनेक मंदिरामध्ये अभिषेक करण्यात येत होता. (प्रतिनिधी)