लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गुजरात, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २९ जून ते ३ जुलैदरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात ३० जून ते ३ जुलै या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी व्यक्त केली आहे.
पुढील चार ते पाच दिवसांत वायव्य आणि ईशान्य भारतात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाजही विभागाने वर्तविला आहे. उत्तर ओडिशा-गंगेच्या पश्चिम बंगाल किनारपट्टीला लागून असलेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या वायव्य बंगालच्या उपसागरावर वसले आहे, असे हवामान कार्यालयाने सांगितले. ईशान्य राजस्थान, बिहारच्या सीमेला लागून असलेला पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तर-पश्चिम उत्तर प्रदेशात कमी उष्णकटिबंधीय पातळीवर चक्रीवादळ निर्माण झाले आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.