Join us

मुंबई, ठाण्यासह राज्यभरात मुसळधार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 7:05 AM

मुसळधार पावसाने मुंबईत ५ ठिकाणी बांधकामाचा भाग काेसळला. विशेषत: मुंबईच्या उपनगरांत रात्री उशिरापर्यंत पावसाची तुफान फटकेबाजी सुरू होती.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने गुरुवारी मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरांत सकाळपासूनच अक्षरश: धडकी भरेल असा पाऊस पडला. रायगड जिल्ह्यातील सततच्या पावसाने राेहा तालुक्यातील कवाळटे केळघर येथे दरड काेसळली. त्यामुळे राेहा व मुरूड तालुक्यातील दळणवळणाचा मार्ग बंद झाला. पावसामुळे वसई-विरारच्या अनेक भागांत पाणी तुंबले होते. ठाण्यातही दुपारनंतर पावसाने जोर धरल्याचे दिसून आले. यामुळे वाहतुकीवरदेखील परिणाम झाला. 

मुसळधार पावसाने मुंबईत ५ ठिकाणी बांधकामाचा भाग काेसळला. विशेषत: मुंबईच्या उपनगरांत रात्री उशिरापर्यंत पावसाची तुफान फटकेबाजी सुरू होती. पावसाचा जोरदार मारा असूनही मुंबईचा वेग मात्र तसूभरही कमी झाला नव्हता. उपनगरी रेल्वेसह येथील रस्ते वाहतूक सर्वसाधारणरीत्या सुरू होती.                   मुलुंडमध्ये घरावर भिंत कोसळून एकाचा मृत्यूमुलुंड पश्चिमेकडील वायदे चाळ येथे गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कम्पाउंड वॉल घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दिलीप वर्मा (३५) यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत जखमी झालेल्या वर्मा यांना मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान रुग्णालय प्रशासनाने केले.

कोल्हापुरात सर्वच नद्या पात्राबाहेरकोल्हापुरातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून, एका रात्रीत जिल्ह्यातील सर्वच नद्या पात्राबाहेर पडल्या, तर तब्बल ५५ बंधारे पाण्याखाली गेले. गगनबावड्यात ढगफुटीसदृश १८२ मिलिमीटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस सुरू आहे.  

टॅग्स :पाऊस