लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाचा फटका मध्य आणि कोकण रेल्वेला देखील बसला आहे. या दोन्ही मार्गावरील अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही ट्रेन वळविण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील काही ट्रॅक हे अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या गोरखपूर, पटना, लातूर, पुणे, कोल्हापूर, अमरावती व नांदेड येथून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आल्या, तर मुंबईतून सोलापूर, हुबळी व आदिलाबाद येथे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या.
कोकण रेल्वे मार्गावर वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे, तसेच चिपळूण व कामथे स्थानकांवर पाण्याची पातळी वाढल्यामुळे रेल्वे मार्ग अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे मंगळुरू- मुंबई गाडी कामथे स्थानकावर, एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन गाडी संगमेश्वर रोड स्थानकावर, कोचुवेली- अमृतसर गाडी रत्नागिरी स्थानकावर, तिरुवनंतपुरम- एलटीटी गाडी विलावडे स्थानकावर, तिरूनेलवेली -दादर गाडी राजापूर रोड स्थानकावर, तिरुवनंतपुरम- हजरत निजामुद्दीन गाडी वेरना स्थानकावर, मडगाव -मुंबई गाडी मजोरडा स्थानकावर, दादर- सावंतवाडी चिपळूण येथे व मुंबई- मडगाव जनशताब्दी गाडी खेड स्थानकावर रद्द करण्यात आली, तसेच या मार्गावरील अनेक गाड्या पुणे-मिरज मार्गावरून देखील वळविण्यात आल्या आहेत.