Join us

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 5:26 PM

बुधवारी हे चक्रीवादळ दमण, हरिहरेश्वर आणि अलिबागला ओलांडेल. यावेळी ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील. चक्रीवादळामुळे ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

 

  • ताशी १२० किमी वेगाने वारे वाहणार; आज निसर्ग चक्रीवादळमहाराष्ट्राला धडकणार
  • दमण, हरिहरेश्वर, अलिबाग ओलांडताना मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार

 

मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले निसर्ग नावाचे चक्रीवादळ ताशी ११ किलोमीटर या वेगाने पूर्व दिशेकडे पुढे सरकत आहे. बुधवारी हे चक्रीवादळ दमण, हरिहरेश्वर आणि अलिबागला ओलांडेल. यावेळी ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील. चक्रीवादळामुळे ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईच्या समुद्र किनारी एक ते दोन किंवा त्यापेक्षाही जास्त मीटर उंचीच्या लाटा उसळतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळ पणजीपासून २८० किमी, मुंबईपासून ४३० किमी आणि सुरतपासून ६४० किमी अंतरावर होते. ताशी ११ किलोमीटर या वेगाने हे चक्रीवादळ उत्तर-पूर्व दिशेकड सरकत आहे. पुढच्या बारा तासांमध्ये याचा वेग आणखी वाढणार आहे. बुधवारी दुपारी अथवा सायंकाळी हे चक्रीवादळ उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरातदरम्याचे हरिहरेश्वर, दमण आणि अलिबाग ओलांडेल. यावेळी येथे ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील. परिणामी सर्व यंत्रांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

.................................

समुद्र किनारी इशारा

अरबी समुद्रात ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. वा-याचा वेग ताशी १२० किलोमीटरपर्यंत जाईल. समुद्र खवळलेला राहील. मोठया उंचीच्या लाटा उसळतील. विशेषत: महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागावर चक्रीवादळाचा मोठा परिणाम होत आहे. परिणामी ५ जूनपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. 

.................................

चक्रीवादळामुळे कुठे पडणार पाऊस

- कर्नाटक किनारी भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा

- मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वलसाड, नवसारी, दमण, दादरा नगर हवेली, सुरत, मध्य प्रदेश

.................................

  • घरे आणि झोपड्यांंची हानी होईल.
  • पॉवर आणि कम्युनिकेशन लाइन्स बिघडतील.
  • गुजरामध्ये समुद्र किनारी पूर येण्याची शक्यता आहे.
  • केळी, पपईसारख्या शेताचे नुकसान होईल.
  • झाडे मोठया प्रमाणावर कोसळतील.
    • मिठागरांचीदेखील हानी होईल.
टॅग्स :निसर्ग चक्रीवादळचक्रीवादळमुंबईमहाराष्ट्र