आला पावसाळा... पाय सांभाळा
By Admin | Published: June 27, 2015 11:31 PM2015-06-27T23:31:40+5:302015-06-27T23:31:40+5:30
पावसाळयामध्ये भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत असताना पायांची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाच्या साचलेल्या पाण्यात
भाग्यश्री प्रधान, ठाणे
पावसाळयामध्ये भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत असताना पायांची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाच्या साचलेल्या पाण्यात अनेक रोगजंतू असल्याने पायांना त्वचारोग होण्याचे प्रमाण वाढले असून लहान मुले, मधुमेही, त्याचप्रमाणे बूट वापरणाऱ्या अनेकजणांना पायाचे आजार होत असल्याचे त्वचा रोग तज्ज्ञ राजेश जाधव यांनी सांगितले.
पावसाळयामध्ये पायांच्या बोटांमधील बेचक्यांमध्ये चिखल्या होण्याचे प्रमाण अधिक असते. तसेच पूर्ण शरीराचा भार पायावर पडल्याने पायाचे आजार पूर्णपणे बरे होण्यास फार वेळ लागतो. मधुमेही व्यक्तींची पायाची संवेदना कमी झालेली असते. त्यामुळे पायाला लागले तरी कळत नाही आणि अशावेळी पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्ये पाय गेला तर जखमेत रोगजंतू शिरतात. ही जखम चिघळून गँगरीन होण्याची शक्यता असते. सकाळी घरातून बूट घालून जाणारा व्यक्ती दिवसभर आॅफिसमध्ये ओले बूट घालून बसल्याने ८-९ तास ते पायातच राहतात आणि पावसाच्या पाण्याने ओले झालेले बूट व मोजे पायातच सुकतात. मात्र त्यावरचे रोगजंतू त्वचेच्या छिद्रातून आत जाऊन त्वचारोग होण्याचा संभव अधिक असतो. काही त्वचा रोग जखम झाल्याने लक्षात येतात. मात्र, जंतू त्वचेच्या छिद्रातून आत शिरल्याने होणारे त्वचारोग पटकन लक्षात येत नाहीत. त्यामुळे गमबूट घालणाऱ्या नागरिकांनीही ही काळजी घेणे गरजेचे आहे. साचलेल्या पाण्यात उंदीर, घूस यासारखे प्राणी आपले मलमुत्र विसर्जन करतात व मरतातही.त्यांच्या या मलमुत्रात, कुजलेल्या शरिरात असलेला लॅप्टोस्पायरासेस नावाचा जंतू पाण्यात पसरतो. अशा पाण्यात जखम झालेला पाय गेला असता लॅप्टोस्पायरासिस होण्याची शक्यता असते.
त्वचारोग होऊ नये म्हणून हे करा
-बाहेरून आल्यानंतर एका टबमध्ये जंतुनाशकयुक्त पाणी घ्यावे त्या पाण्यात १०-१५ मिनिटे पाय बुडवून ठेवावे आणि पायाची हालचाल करावी. त्यानंतर ते कॉटनच्या फडक्याने हळूवार पुसून कोरडे करावेत.पायांच्या बोटांमध्ये पाणी साचून देऊ नये. आॅफिसमध्ये ओले बूट घालून दिवसभर बसू नये,यासाठी शक्य असल्यास आॅफीसमध्ये स्लीपर वापराव्यात. पावसाळ्यात पाय मोकळे राहतील अशा चपला वापरणे अतिशय उत्तम. मेडिकलमध्ये मिळणाऱ्या कॅन्डीड नावाच्या अॅन्टी फंगल पावडरचा अवश्य वापर करावा.
-लहान मुलांना पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात खेळण्यास आवडते. मात्र त्यांच्या नाजूक त्वचेला संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शक्यतो लहानमुले पाण्यात खेळणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे.