मुसळधार पावसाने मुंबई तुंबली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 03:00 PM2020-09-23T15:00:48+5:302020-09-23T15:01:27+5:30
कुलाबा १४७.८ मिमी; सांताक्रूझ २८६.४ मिमी
मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात मंगळवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळी मुंबई बंद पाडली. मंगळवारी मध्यरात्रीसह बुधवारी पहाटे पावसाचा जोर कायम राहिल्याने रस्ते, रेल्वे आणि ठिकठिकाणी पाणी साचले. याचा विपरित परिणाम रस्ते वाहतूकीसह रेल्वे वाहतूकीवर झाला. त्यामुळे भल्या पहाटेच या दोन्ही सेवा कोलमडल्या. या व्यतिरिक्त अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः भलया पहाटे कार्यालय गाठणा-या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. बुधवारी सकाळसह दुपारी हा पाऊस लागून राह्ल्याने मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली होती.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशारा-यानंतर सतर्कतेचा उपाय म्हणून बुधवारी सकाळीच मुंबईतल्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले होते. शिवाय नागरिकांनी आवश्यता असेल तेव्हा घराबाहेर पडावे, असेही आवाहन करण्यात आले होते. बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. त्यानुसार मुंबईत दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. याच काळात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बुधवारी सकाळी वरळी सीफेस सोबत पाणी साचलेल्या ठिकाणी दाखल होत या परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी करण्यात आलेल्या उपाय योजनांचा आढवा घेतला. शिवाय नालेसफाई १०० टक्के झाल्याचा दावा देखील केला.
बुधवारी दिवसभर पाऊस लागून राहिला असतानाच दादर टीटी सर्कल, परळ, सायन रोड नंबर २४, नानाचौक, हिंदमाता, बावला कम्पाऊंड, गोल देऊळ, मुंबई सेंट्रल, श्रीराम जंक्शन वडाळा, वरळी सी फेस, लोटस जेटी वरळी, बेहराम बाग जंक्शन, शक्कर पंचायत चौक, चुनाभटटी, कुर्ला क्रांतीनगर, मालाड सब वे, दहिसर सब वे, मिलन सब वे, मानखुर्द सब वे येथे पाणी साचले होते. तर हिंदमाता, गांधी मार्केट, सायन रोड क्रमांक २४, वडाळा ब्रीज, किंग्ज सर्कल, भाऊ दाजी रोड, खोदादाद सर्कल, मडकेबुवा चौक, कुर्ला डेपो, शीतल सिनेमा, शेल कॉलनी, कल्पना सिनेमा, मालाड सबवे, एस.व्ही.रोड, अंधेरी मार्केट, शास्त्री नगर, ओबेरोय मॉल, मिलन सबवे, वाकोला येथे बेस्ट बसची वाहतूक वळविण्यात आली होती.
-----------------------
बुधवारी सकाळी ८ पर्यंतचा पाऊस
शहर २६७.६२ मिमी
पूर्व उपनगर १७३.२२ मिमी
पश्चिम उपनगर २५१.४८ मिमी