मुंबई : शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मानवासह पशु-पक्ष्यांवरही बसला. मुंबईतील विविध प्राणिमित्र संस्थांच्या हेल्पलाइनवर पशू-पक्षी जखमी झाल्याची माहिती नागरिकांकडून दिली जात होती. या वेळी मुलुंडच्या ‘रॉ’ संस्थेने आतापर्यंत ५० हून अधिक पशू-पक्षी विविध ठिकाणाहून रेस्क्यू केले आहेत. तसेच काही पशू-पक्षी जखमी अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.‘रॉ’ संस्थेचे संस्थापक पवन शर्मा यांनी सांगितले की, मैना, काठसारंग, घुबड, फ्लेमिंगो, कावळा, कबुतर इत्यादी पक्षी; याशिवाय नाग, पाणसाप, अजगर, घोणस, धामण, कपड्या साप आणि कोल्हा इत्यादी प्राणी रॉ संस्थेने रेस्क्यू केले आहेत. पाण्याच्या प्रवाहातून वाहून मानवी वस्तीमध्ये गेलेले पशु-पक्षी पावसापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित जागेचा आधार घेतात. त्यांना रेस्क्यू करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. काही जण जोरदार पावसामुळे भरटकले होते; तर काही पाण्यात भिजल्यामुळे थकले होते. त्यामुळे बरेच पक्षी उडू शकत नव्हते.साधारण १७ पशु-पक्ष्यांना आतापर्यंत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे, असेही भाष्य पवन शर्मा यांनी केले.
मुसळधार पावसाचा पक्ष्यांना बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 3:19 AM